Lok Sabha Election 2024: मुंबई : सध्या लोकसभेची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी राज्यासह (Maharashtra News) संपूर्ण देशाता पाहायला मिळत आहे. भाजपनं (BJP) सत्ता काबीज करण्यासाठी तर विरोधकांनी भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी एकजूट केली आहे. अशातच राज्यात मात्र विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मात्र फारसं काही आलबेल दिसत नाही. लोकसभेच्या जागावाटपावरुन धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीचा जागावाटप अद्यापही पूर्ण झालेला नाही. मात्र विदर्भातील दहा जागांवर संभाव्य जागावाटप कसा राहील? याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. 


पूर्व विदर्भातील सहा लोकसभा मतदार संघापैकी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक हे पाच लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात काँग्रेसला यश आल्याची माहिती आहे. यापैकी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असायचा. मात्र राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भंडारा-गोंदिया हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. तर रामटेक मतदार संघ परंपरेने शिवसेनेकडे असायचा. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी एकनाथ शिंदे यांची वाट धरल्यानंतर शिवसेना उबाठा गटानं रामटेक मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास होकार दिल्याची माहिती आहे. 


वर्धा लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये शर्यत


वर्धा लोकसभा मतदार संघ परंपरेनं काँग्रेसकडे राहिला आहे. मात्र या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं वर्ध्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या मोबदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला वर्धा लोकसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे.


तिकडे पश्चिम विदर्भातील चार लोक सभा मतदार संघासाठी ही मविआचा जागावाटप जवळपास निश्चित झाला आहे. बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम या दोन मतदारसंघासाठी शिवसेना उबाठा ने जोरदार आग्रह धरला असून दोन्ही मतदारसंघ त्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तर अकोला लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी इमानेइतबारे महाविकास आघाडीचा भाग झाल्यास त्यांच्यासाठी सोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील दहा लोकसभा जागांपैकी सहा जागांवर काँग्रेस, दोन मतदारसंघात शिवसेना उबाठा, एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर एक जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडली जाऊन जागा वाटपाचा अंतिम फॉर्मुला निश्चित होऊ शकतो.