मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर होताच राजी-नाराजी आणि पक्षात बंडखोरीचा सुळसुळाट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. तर महायुतीमध्ये इच्छुक भाजपा उमेदवाराला केवळ राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असल्याने तिकीट मिळालं नाही. त्यामुळे, भाजपचे (BJP) इच्छुक नेते नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडण्यात आल्याने येथील मतदारसंघातून इच्छुक असलेल्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी थेट दिल्लीच गाठल्याचं पाहायला मिळालं. विवेक कोल्हे यांच्यासह त्यांनी अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. 


कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. कारण, महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने थेट दिल्ली गाठून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री उशिरा ही भेट झाल्याची माहिती आहे. दिल्लीतील या भेटीत कोल्हे परिवारास अमित शाह व फडणवीस यांनी शब्द दिल्याची माहिती आहे. त्यामुळे, कोल्हे कुटुंबीयांनी बंडखोरी न करता, महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. देवेंद्र फडणवीसांना येथील बंडखोरी रोखण्यात यश आलं आहे.  


माजी आमदार स्नेहलता कोल्हे ह्या आपल्या मुलासाठी म्हणजेच विवेक कोल्हे यांच्या उमेदवारासाठी आग्रही होत्या. मात्र, कोपरगाव मतदारसंघ अजित पवार गटाला गेल्याने अजित पवारांच्या पहिल्याच यादीत कोपरगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात झालेली बंडखोरी शमविण्यासाठी थेट दिल्लीकरांकडून शब्द घ्यावा लागला आहे. त्यानंतर, महायुतीत बंडखोरी शमविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलं आहे. 


लोकसभा निवडणुकांवेळीही नाराजी


लोकसभा निवडणुकांवेळीही भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नाराजी दर्शवली होती. त्यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्नेहलता कोल्हे यांची शिर्डीत बैठक झाली. अनेक दिवसांपासून स्नेहलता कोल्हे या पालकमंत्री राधाकृष्ण विखेंवर नाराज असल्याचे पाहायला मिळायला मिळाले होते. त्यामुळे, कोल्हे या शिर्डी लोकसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात दिसल्या नाहीत. मात्र, मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक झाल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यात आली होती. यावेळीही, देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केली होती. 


हेही वाचा


मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट