मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडीकडून अद्यापही जागावाटपाच्या बैठकाच सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये, भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने 45 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यातच, आज राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून लवकरच म्हणजे उद्याच त्यांच्या पक्षाची दुसरी उमेदवार यादी जाहीर होणार आहे. अजित पवारांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत काही विद्यमान आमदारांची नावे नसल्याने अनेकांची धाकधूक वाढलीय. तर, भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या राजकुमार बडोले यांना अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून उमेदवारी देत विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापण्यात आलंय. मात्र, राजकारणात निवृत्ती जाहीर केलेल्या प्रकाश सोळंके (Prakash solanki) यांना अजित पवारांनी (Ajit pawar) मैदानात उतरवले आहे. योग्य वयात निवृत्त व्हायला पाहिजे, असे आमदार प्रकाश सोळुंके यांनी शरद पवारांना उद्देशून म्हटले होते. मात्र, आज त्यांचं नाव यादीत जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंची उमेदवारी जाहीर झाली आहे, तर माजलगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे, राजकारणातून निवृत्ती घोषित केलेल्या नेत्यालाही अजित पवारांनी अस्तित्वाची ठरत असलेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकाश सोळंके आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील गावांचे दौरे करत होते. त्याचवेळी त्यांनी यंदाची विधानसभा लढवणार नसल्याची घोषणा केली. तसेच, आपले राजकीय वारसदार म्हणून त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा देखील त्यांनी केली होती. 


मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्याने नाराज


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचील दिग्गज नेत्यांच्या फळीतील एक नाव म्हणजे, प्रकाश सोळंके. त्यांनी राष्ट्रवादीच्या काळात अनेक मंत्रीपदंही भूषवली आहेत. गेल्या निवडणुकीत एका सभेतील भाषणादरम्यान, 2024 ची निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचं सांगितलं होतं. 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण, त्यावेळी मंत्रीपदाची माळ प्रकाश सोळंकेंच्या गळ्यात पडली नाही. त्यामुळे पुढे अनेक दिवस सोळंकेंचं 'राजीनामा नाट्य' सुरू होतं. पण, त्यांना मंत्रीपद मिळालंच नाही. अखेर त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मतदारसंघात कामं करायला सुरुवात केली होती. मात्र, 2024 ची विधानसभा लढवणार नसून राजकीय निवृत्ती घेत असल्याची घोषणा त्यांनी केली होती.



राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी


बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
कागल- हसन मुश्रीफ 
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवाळ
अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
श्रीवर्धन-  आदिती तटकरे
अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
उदगीर- संजय बनसोडे 
अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वाई- मकरंद पाटील
सिन्नर- माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
शहापूर- दौलत दरोडा
पिंपरी- अण्णा बनसोडे
कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले - किरण लहामटे
वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
मावळ- सुनील शेळके
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
हडपसर- चेतन तुपे
देवळाली- सरोज आहिरे
चंदगड - राजेश पाटील
इगतुरी- हिरामण खोसकर
तुमसर- राजे कारमोरे
पुसद -इंद्रनील नाईक
अमरावती शहर- सुलभा खोडके
नवापूर- भरत गावित
पाथरी- निर्णला विटेकर
मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला