Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरच्या राजकारणात सुरु असलेला उलथापालथीचा कार्यक्रम सुरुच आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ जागावाटपासूच चर्चेत सर्वाधिक असून आता विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी मुलगा सत्यजित जाधव यांच्यासह हाती शिवधनुष्य हाती घेत धक्का दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये आणि पर्यायाने जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सतेज पाटील यांना उत्तरमधील घडामोडींवरून सलग दुसऱ्यांदा धक्का बसला आहे. 


महायुतीसह महाविकास आघाडीमध्येही मतदारसंघावरून रस्सीखेच 


कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा सर्वाधिक संवेदनशील विषय कोल्हापूरच्या राजकारणात होऊन गेला आहे. बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये हा मतदारसंघ कोणाकडे याची उत्सुकता होती. महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये सर्वाधिक रस्सीखेच होती, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये लढाई सुरु होती. मात्र, दोन्ही आघाड्यांनी विद्यमान आमदार ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाला ती जागा असे धोरण अवलंबल्याने  जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. 


मतदारसंघावरून महायुती जोरदार रस्सीखेच, महाडिक यांच्याकडूनही प्रयत्न


कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत होता. मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार हा विषय सुद्धा जागा वाटपामध्ये अत्यंत कळीचा झाला होता. शिंदे आणि भाजपने कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर दावा केला होता. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये चढाओढ होती. भाजपने 2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये जयश्री जाधव यांच्या विरोधात 80 हजारांवर मते सत्यजित कदम यांनी घेतली. त्यामुळे शिंदे गटामध्ये गेलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर भाजपने आव्हान निर्माण केले होते. खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या मुलासाठी या मतदारसंघातून प्रयत्न केले.


कृष्णराज महाडिक यांना शिंदे गटातून उमेदवारी देण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंडावेळी साथ दिलेल्या आमदारांना नाराज न करता क्षीरसागर यांनाच उमेदवारी दिली. सत्यजित कदम यांची सुद्धा नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं. सत्यजित कदम यांना सोबत घेऊनच राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचले होते. त्यामुळे सत्यजित कदम यांची संभाव्य बंडखोरी सुद्धा शांत करण्यामध्ये यश आलं होतं. 


हा सर्व घटनाक्रम होत असतानाच आता थेट विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गळाला लावत कोल्हापूरमध्ये काँग्रेसला धक्का असला, तरी तो पक्षापेक्षा सतेज पाटील यांनाच सर्वाधिक आहे. ज्या आमदाराला निवडून आणण्यासाठी सतेज पाटील यांनी सर्वस्व पणाला लावले, सर्व राजकीय यंत्रणा राबवली, तोच आमदार आज शिंदे गटात गेल्याने पाटील यांच्यासाठी सुद्धा धक्काच आहे. 


चंद्रकांत जाधव आणि जयश्री जाधवांच्या विजयात सतेज पाटलांची यंत्रणा 


2019 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्याने उद्योजक स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर उत्तरमधून विजय मिळवला. चंद्रकांत जाधव यांची कोल्हापूर फुटबॉलमध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी ओळख होती. त्यांचा कामगार ते उद्योजक असा प्रवास राहिला. उद्योजक निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्याने कोल्हापुरातील सन्मित्र उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी चंद्रकांत जाधव आपलाच उमेदवार समजून त्यांच्यासाठी घाम गाळला होता. सतेज पाटील यांची यंत्रणा सुद्धा चंद्रकांत जाधव यांच्यासाठी राबली होती. त्यामुळे चंद्रकांत जाधव पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले. 


चंद्रकांत जाधव यांचे निधन, जयश्री जाधव राजकारणात 


आमदारकीनंतर अडीच वर्षांमध्ये चंद्रकांत जाधव यांचे अल्पशा आजारांनी निधन झाल्याने या 2022 मध्ये पोटनिवडणूक निवडणूक लागली. पोटनिवडणुकीमध्ये जयश्री जाधव यांना निवडून आणण्यात सुद्धा तसेच राजकीय संदर्भ बदलले असताना सुद्धा सतेज पाटील यांनी विजयासाठी जीवाचं रान केलं होतं. भाजपकडून सर्व यंत्रणा या ठिकाणी राबविण्यात आली होती. भाजपचे राज्यपातळीवरील सर्वच नेत्यांनी कोल्हापूरमध्ये ठाण मांडलं होतं. मात्र, सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा मुरब्बीपणा दाखवत पोटनिवडणूक जिंकली होती. 


अजिंक्यतारावरून जयश्री जाधवांचा प्रचार 


जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी संपूर्ण यंत्रणा अजिंक्यतारावरून कार्यरत होती. झेंडे लावण्यापासून ते गुलाल लागेपर्यंत टीम म्हणून काम केलं जातं होतं. जयश्री जाधव यांच्या विजयासाठी 70 ते 75 जणांची टीम विजयासाठी कार्यरत होती. 


कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवार बदलाची नामुष्की


मात्र, पुन्हा एकदा 2024 मध्ये कोल्हापूर उत्तरमध्ये राजकीय संदर्भ बदलून गेले आहेत. ज्या जयश्री जाधव यांच्या विजयासाठी सतेज पाटील यांनी यंत्रणा राबवली, भाजपला अंगावर घेतलं, त्या जयश्री जाधव आता शिंदे गटामध्ये सामील झाल्या आहेत. राजेश लाटकरसारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देत वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, काँग्रेसमधील माजी नगरसेवकांनी सतेज पाटील यांना पत्र लिहीत राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. तत्पूर्वी, काँग्रेस जिल्हा कमिटीच्या कार्यालयावर सुद्धा हल्ला करण्यात आला. 


त्यामुळे सतेज पाटील यांना एक पाऊल मागे जाऊन उमेदवार बदलण्यासाठी चर्चा केली. त्यामुळे राजेश लाटकर यांची जाहीर झालेली उमेदवारी अवघ्या काही तासांमध्ये रद्द करून मधुरिमाराजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी मधुरिमाराजे यांना दोन महिन्यापूर्वी उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, शाहू महाराज खासदार झाल्याने निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी नकार दिला होता. मात्र राजेश लाटकरांच्या निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीमुळे मधुरिमाराजे रिंगणात आल्या. 


राजेश क्षीरसागरांना दिलासा 


दुसरीकडे, कोल्हापूर उत्तरमधील पुन्हा एकदा बदललेले संदर्भ पाहता राजेश क्षीरसागर यांच्यासाठी लढत सोपी कशी होईल याकडे एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उमेदवारी रद्द केल्याने राजेश लाटकर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजेश लाटकर यांनी त्यांचा प्रभाव असलेल्या ई वाॅर्डमधील कदमवाडी, सदर बाजार परिसरातून शाहू महाराज यांना लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक मताधिक्य दिले होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान सुद्धा काँग्रेस नेतृत्वासमोर असेल. 


मधुरिमाराजे यांना आव्हान वाढले 


ऐनवेळी रिंगणात उतरल्याने मधुरिमाराजे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक यामध्ये शंका नाही. अर्थात मधुरिमाराजे या माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या असल्याने त्यांनी राजकारण लहानपणापासून पाहिलं असल्याने घरातूनच बाळकडू मिळालं आहे. आता राजघराण्याचा वारसा असल्याने कोल्हापूर उत्तरची लढाई आणखी टोकदार झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या