मुंबई: लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचा प्रमुख चेहरा आणि ज्येष्ठ नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. रवी राजा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


रवी राजा यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये आणखी मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. कारण, रवी राजा यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मुंबई काँग्रेसमधील काही पदाधिकारी मैदानात उतरले आहेत. या सर्वांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवरून उघड नाराजी व्यक्त केली आहे. सायनचे माजी आमदार जग्गनाथ शेट्टी यांचा मुलगा व मुंबई काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी अमित शेट्टींची वर्षा गायकवाड यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गांधींच्या पक्षात गोडसेंचे राज्य आहे. काँग्रेस विकण्याचे पाप खासदार वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने केले आहे. ज्येष्ठ नेते रवी राजा देखील पक्ष सोडून गेले, त्याला कारण देखील हे दोघेच आहेत, अशी टीका अमित शेट्टी यांनी केली.


रवी राजा राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले?


काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात जात असलेल्या रवी राजा यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना आपली खंत आणि खदखद बोलून दाखवली. मी
गेली 44 वर्षे मी प्रामाणिकपणे काम केले,पाच वेळा नगरसेवक होतो,विरोधी पक्षनेता होतो. सायन कोळीवाड्यात मी तिकीट मागितले,पण 2019 मध्ये हरलेल्या नेत्याला उमेदवारी दिली. काँग्रेसमध्ये मेरीटवर तिकीट देत नाहीत. वशिला नाही,लॉबिंग असणाऱ्यांना तिकीट मिळते. दिल्लीत माझा वशिला नाही, असे रवी राजा यांनी म्हटले.


सायन कोळीवाड्यातून उमेदवारी न मिळाल्याने रवी राजांचा टोकाचा निर्णय 


रवी राजा हे सायन कोळीवाड्यातून विधानसभेसाठी इच्छूक होते. रवी राजांच्या उमेदवारीला अनेक वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा होता. पण काँग्रेस नेतृत्त्वाने रवी राजांना डावलून गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या रवी राजा यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. रवी राजा यांनी बुधवारी मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे काँग्रेसचे सदस्यत्व आणि पदांचा राजीनामा पाठवून दिला. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 


कोण आहेत रवी राजा ?


रवी कोंडु राजा हे मुंबई महापालिकेतले काँग्रेसचे बडे नेते


पाच वेळा मुंबई महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक


रवी राजा हे उत्तम संघटक, फर्डा वक्ता आणि अभ्यासू नेता म्हणून ओळखले जातात


काँग्रेसचा महापालिकेतला चेहरा अशी ओळख


वॉर्ड नंबर १७६ मधून मुंबई मनपाचे नगरसेवक


भाजप-सेनेच्या मनपात रवी राजा यांनी काँग्रेसचे अस्तित्व टिकवले होते


मुंबई विद्यापीठात एम कॉमपर्यंत शिक्षण 


सायन कोळीवाड्यात तमीळ व मराठी मतदारांत राजा लोकप्रिय


रवी राजा अनेक वर्षे बेस्ट समितीवर होते. या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे.


आणखी वाचा


विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का,निष्ठावंत नेत्याचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार