कोल्हापूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळाली असून यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


शंभर,  दोनशे नव्हे तर तीनशे टक्के सांगतो भाजपचा विजय नक्की आहे असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर भाजपने कोल्हापूरच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. 


पोटनिवडणुकीच्या निमित्ताने का असेना भाजप कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडणार? की महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव या कोल्हापुरातून पहिल्या महिला आमदार म्हणून विधानसभेत जाणार याचा फैसला उद्याच्या निकालानंतर होणार आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. आता उत्सुकता आहे ती निकालाची.


महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या निवडणुकीत जोरदारपणे उतरले. त्यामुळे कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आपल्याला निवडून देईल असं जयश्रीताई जाधव यांनी बोलून दाखवलं.


कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा,



  • 2009 साली काँग्रेसच्या छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले. राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला.

  • 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22,421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले. त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते.

  • 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15,199 मतांनी पराभव करून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते.


महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. यामध्ये जवळपास 60 टक्के मतदान झालं आहे. शिवसेनेची नाराज मते कुणाच्या पारड्यात पडणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला? त्यामुळे अजूनही राजकीय विश्लेषकांना या निवडणुकीचा अंदाज येत नाही.


महत्वाच्या बातम्या: