Kolhapur News Update : 3 मे नंतर माझी दिशा वेगळी असणार आहे, असे सूचक वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) यांनी केले आहे. येत्या 3 मे रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपत आहे. त्या पूर्वी त्यांनी आज कोल्हापुरात हे सूचक वक्तव्य केले आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
संभाजीराजे म्हणाले, "मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. मी सामाजिक काम करत आहे. त्यावर कोण कसे भाष्य करेल हे सांगता येत नाही. कोणी काय बोलावे, यावर मी सांगणार नाही. मी प्रामाणिक काम करत असतो. " मराठा समाजाच्या आंदोलनावेळी कोल्हापूरच्या राजांच्या डोळ्यातून अश्रू निघाले होते. त्या अश्रूंचा वचपा कोल्हापूरकर काढतील, असे भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले होते. त्यावर बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
"आज मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यासाठी 30 सेंकद विचार करून मी मतदान केले. 3 मे रोजी माझ्या खासदारकीची मुदत संपत आहे. त्यानंतर आपली दिशा वेगळी असणार आहे. तीन तारखेनंतरच याबाबतची भूमिका काय असेल हे जाहीर करणार आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणाला देखील बसले होते. महाविकास आघाडी सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण सोडलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या