Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोन्ही आघाड्यांना बंडखोरांनी चांगलंच ग्रहण लावलं आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत पुढील चार दिवस बंडखोरांना थंड करण्यासाठीच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांची दमछाक होणार आहे. त्यामुळे बंडखोर कोणाला दिवाळी करून देणार आणि कोणाचं दिवाळं काढणार याची सुद्धा चर्चा रंगली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीची सर्वदूर लागण! 


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर उत्तर, करवीर, इचलकरंजी, राधानगरी, चंदगड, हातकलंगले, शिरोळ आदी मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चर्चा कोल्हापूर उत्तर विधानसभेची झाली. कोल्हापूर उत्तरमध्ये तिकीट कोणाला मिळणार याचीच उत्सुकता सर्वाधिक असतानाच राजेश लाटकर यांनी बाजी मारली. मात्र, राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधूनच प्रचंड विरोध झाल्याने अवघ्या काही तासांमध्ये त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली. त्यामुळे मधुरिमाराजे यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. दरम्यान, मधुरिमाराजे यांनी अर्ज भरला असला तरी राजेश लाटकर यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे.


विनय कोरेंच्या मनात आहे तरी काय? 


दुसरीकडे, करवीर विधानसभा मतदारसंघांमध्येही जनसुराज्य शक्ती पक्षाच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या गेल्या आहेत. करवीरमध्ये शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. मात्र जनसुराज्यकडून संताजी घोरपडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जनसुराज पक्ष सहयोगी पक्ष असतानाही संताजी घोरपडे यांची उमेदवारी अजूनही कायम असल्याने विनय कोरे यांच्या मनात आहे तरी काय असाच प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे जनसुराज्यकडून हातकणंगलेमध्ये अशोकराव माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना शिंदे गटाकडून सुद्धा पाठिंबा देण्यात आला आहे. असे असतानाही जनसुराज्यचा करवीरमध्ये शिंदेविरोधातील उमेदवार अजूनही कायम आहे. ही भूमिका चर्चेत असताना चंदगडमध्येही जनसुराज्यकडून मानसिंग खोराटे यांना उमेदवारी दिल्याने आणखी चर्चेत भर पडली आहे. त्यामुळे मानसिंग खोराटे आणि संताजी घोरपडे यांची उमेदवारी कायम राहणार का? याची उत्सुकता आहे. 


राधानगरीमध्येही बंडखोरी 


राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा बंडखोरी झाली आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार के पी पाटील रिंगणात आहेत. त्यांची लढत शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी होईल. मात्र, ए. वाय. पाटील यांच्या बंडखोरीने के पी पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ए. वाय. पाटील यांनी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज माघार घेणार नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी राधानगरी तालुक्याचाच आमदार असेल असं म्हणत त्यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर केली जाणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल.


दुसरीकडे, चंदगड विधानसभेला सुद्धा बडखोरांनी चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर रिंगणात आहेत. महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात भाजपच्या शिवाजी पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. जनसुराज्यकडून मानसिक खराटे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे. विनायक पाटील आणि गोपाळराव पाटील यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नंदाताई बाभुळकर यांच्या समोर आव्हान निर्माण झालं आहे. 


स्वाभिमानीकडून ठाकरेंचे दोन माजी आमदार गळाला


दुसरीकडे, हातकलंगले आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठाकरे गटातील दोन माजी आमदार गळाला लावले आहेत. हातकणंगलेमधून माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानीमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांनी तब्बल दहा वर्षांनी स्वाभिमानीमध्ये घरवापसी झाली आहे. त्यामुळे सुद्धा या दोन मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. दुसरीकडे, इचलकरंजीमध्ये सुद्धा राहुल आवाडे यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजप नेते हिंदुराव शेळके यांनी बंड पुकारले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे यांना पाठिंबा दिला आहे. अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे यांनी सुद्धा बंडखोरी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या