Salman Khan Death Threat Call : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्यासंदर्भात धमकी मिळाली आहे. सलमानचे जवळचे मित्र माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे. सलमान खानला वारंवार धमक्या मिळत आहेत. यामुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.


सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी 


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी धमकीचा मेसेज आला. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात 354 (2), 308(4) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदल्या दिवशीही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने पैशाची मागणी केली होती.


सलमान खानकडून कोट्यवधी रुपयांची मागणी


बाबा सिद्दीकी यांची मुंबईत भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव समोर आलं. या प्रकरणानंतर सलमान खानला वारंवार धमक्या येत आहेत. बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या धमक्या यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानला सध्या वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.


भाईजानला धमक्या मिळण्याचं सत्र सुरुच


अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. 1998 मध्ये काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. सलमानच्या घरावर या वर्षी एप्रिल महिन्यात गोळीबारही झाला होता. यानंतर दसऱ्याच्या दिवशी सलमानच्या जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. या टोळीकडून धमक्या मिळण्याचं सत्र सुरुच आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मेरो करण-अर्जुन आयेंगे... सलमान-शाहरुखचा आयकॉनिक चित्रपट 29 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर, 'या' दिवशी रिलीज होणार