पुणे : पुण्यातील सदाशिव, नारायण, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि कसबा या पेठांचा या मतदारसंघात समावेश होतो. प्रसिद्ध शनिवारवाडा , लाल ,महल आणि ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचं मंदिर ही इथली ओळख. भाजपचे गिरीश बापट इथून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून गेलेत. त्यावरून या मतदारसंघाचा स्वभाव आणि तोंडवळा लक्षात येण्यास हरकत नाही.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट शहराचे खासदार म्हणून निवडून आल्याने कसब्याची जागा रिकामी झालीय. या रिकाम्या जागेसाठी भाजपमध्ये अक्षरश: झुंबड उडालीय. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने, नगरसेवक धीरज घाटे आणि मुख्यमंत्रांच्या जवळचे मानले जाणारे माजी नगरसेवक गणेश बिडकर अशी भाजपमधील इच्छुकांची भली मोट्ठी यादी आहे. त्याचबरोबर गिरीश बापट स्वतःच्या सुनेला उमेदवारी मिळवून देण्याचाही प्रयत्न करत असल्याचं बोललं जात. दुसरीकडे काँग्रेसकडून नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि नगरसेवक अरविंद शिंदे यांनी इथून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मनसेतून काँग्रेसमध्ये आलेल्या रवींद्र धंगेकरची या मतदारसंघात काम करणारा माणूस अशी प्रतिमा आहे. दोन विधानसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 2009 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून लढणाऱ्या धंगेकरांचा अवघ्या आठ हजारांनीं गिरीश बापटांकडून पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसकडून लोकमान्य टिळकांचे वंशज रोहित टिळक यांना उमेदवारी देण्यात आली होती रोहित टिळक त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिले मात्र त्यांनी घेतलेली चाळीस हजार मतं बापटांच्या पत्थ्यावर पडली.
2014 साली शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदरवारांना विजयासाठी चांगलं मताधिक्य मिळत असताना गिरीश बापट जुजबी मताधिक्यांनी निवडून आले होती होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून गिरीश बापटांना बावन्न हाजराचं मताधिक्य मिळालं. त्यामुळे भाजपसाठी कसब्याची जागा नेहमीप्रमाणे सुरक्षित मानली जातीय. परंतु मनसेकडून गिरीश बापटांना कडवी टक्कर देणारे रवींद्र धंगेकर विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये आलेत. धंगेकरांची स्वतःची मतं आणि काँग्रेसची स्वतःची मत यांची बेरीज झाल्यास ते भाजपच्या नवख्या उमेदवाराला घाम फोडू शकतात. या मतदारसंघात भाजपची जशी परंपरागत मतं आहेत तशीच काँग्रेसचीही आहेत . त्याच मतांच्या आधारे काँग्रेस नेते वसंत थोरात यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गीरीश बापट यांचा पराभव केला होता. मात्र ती गिरीश बापटांच्या राजकारणाची सुरुवात होती. त्यानंतर गिरीश बापटांनी विधानसभेच्या सलग पाच निवडणूक इथून जिंकल्या आणि सोबत भाजपाचाही आणखी विस्तार झाला.
या मतदारसंघात ब्राम्हण मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर मराठा समाजातील मतदार आहेत. अल्पसंख्यांक आणि दलित समाजाचीही इथं बऱ्यापैकी संख्या आहे. त्यामुळं वंचित विकास आघाडी लोकसभेप्रमाणे वेगळी लढल्यास वंचितच्या उमेदवाराने घेतलेली मतं निर्णायक ठरु शकतात. जुन्या वड्यांचा प्रश्न या मतदारसंघात वर्षनुवर्षे रखडलाय. पुण्याच्या इतर भागांचा मेकओव्हर होत असताना पेठा मात्र तशाच जुन्या राहिल्यात . त्यामुळं जुन्या वड्यांचा मुद्दा इथल्या निवडणुकीत महत्वाचा असणार आहे.
भाजपची स्थती इथं मजबूत दिसत असली तरी पक्षांतर्गत गटबाजीही अनेकवेळा दिसून आली आहे. याच गटबाजीतून महापालिका निवडणुकीत गणेश बिडकर यांचा पराभव घडवून आणण्यात आला. आता गणेश बिडकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळीकीचा उपयोग करून कसब्याची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्याचवेळी त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धकही सक्रिय झालेत. काँग्रेसमध्येही रवींद्र धंगेकर आणि अरविंद शिंदे या दोन नगरसेवकांमध्ये चुरस आहे . या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची फारशी ताकत नसल्याने नेहमीप्रमाणे भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगणार हे जवळपास निश्चित आहे . भाजपमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत . तर भाजपमधील नाराजांचा फायदा उठवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल .
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ : भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगणार
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
27 Aug 2019 11:37 PM (IST)
भाजपमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत . तर भाजपमधील नाराजांचा फायदा उठवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -