दहिसर विधानसभा मतदार संघ हे उत्तर मुंबईचं शेवटचं टोक. शिवसेनेचा गड म्हणून ओळख असलेला हा दहिसर मतदार संघ 2014 साली भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर दोन्ही पक्ष वेगळी लढल्याने याचा फटका शिवसेनेला बसला. शिवसेनेच्या पराभवाला मोदी लाटेसोबतच शिवसेनेतली अंतर्गत गटबाजीही कारणीभूत होती. 2014 च्या निवडणुकीत आमदार विनोद घोसाळकर यांना पराभूत करून भाजप उमेदवार मनीषा चौधरी मोदी लाटेत निवडून आल्या.

काय आहे मतदार संघाची राजकीय सद्यस्थिती

आमदार मनीषा चौधरी या जरी मोदी लाटेत आमदार म्हणून निवडून आल्या आणि भाजपने शिवसेनेचा गड जिंकला तरी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात अनेकदा भाजप-शिवसेना अंतर्गत वाद आणि गटबाजीचं राजकारण बाहेर आलं. अनेकदा मनीषा चौधरी समर्थक, भाजप कार्यकर्ते आणि भाजप नगरसेवक विरोधात विनोद घोसाळकर समर्थक, शिवसेना कार्यकर्ते-नगरसेवक यांच्यात वेगवेगळ्या मुद्यावर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. या गोष्टींचा फायदा काँग्रेसला या निवडणुकीत होऊ शकतो. या अंतर्गत गटबाजीमुळे विकासाचे अनेक प्रकल्प रखडून राहिले आहेत. यामुळे काही मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

गणपत पाटील नगर झोपडपट्टीचा पुर्नविकास हा अनेक दिवसापासून रखडलेला आहे. दहिसर नदीचं सौंदर्यीकरण आणि नदीच्या विकासाच्या कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. आगरी-कोळी बांधवाचे अनेक प्रश्न सोडविले गेलेले नाहीत. दहिसरमध्ये वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सुद्धा कोणताही पर्याय निघालेला नाही. त्यामुळे या मतदारांचे मत युतीला कसे मिळणार? या मतदारांचं मन युती कसं जिंकणार हा प्रश्न आहे.

दहिसर मतदार संघात उमेदवारांच्या शर्यतीत नेमकं कोण ?

ह्या मतदार संघामध्ये 2014 ला शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांचा पराभव करून भाजप उमेदवार मनीषा चौधरी निवडून आल्या. त्यामुळे शिवसेनेकडून मिळालेला हा गड राखून ठेवण्यासाठी भाजपच्या मनीषा चौधरी यांना पुन्हा एकदा  युतीकडून उमेदवारी मिळू शकते. मात्र, दुसरीकडे मागील पाच वर्षात ज्या प्रकारे शिवसेना भाजप अंतर्गत वाद समोर आले त्यानंतर भाजप शिवसेनेतील काही जण या उमेदवारीला विरोध करण्याची शक्यता आहे. कारण मनीषा चौधरीबाबत अनेकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर 2014 साली मोदी लाट आणि गटबाजीच्या राजकारणामुळे गेलेला शिवसेनेचा गड जिंकण्यासाठी शिवसेना आग्रही असणार आहे.

शिवसेनेला दहिसरचा गड पुन्हा मिळणार का ?

भाजप शिवसेना युती झाली आणि फिफ्टी फिफ्टी म्हणजेच समसमान वाटप झालं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना तीन आणि भाजप तीन असे उमेदवार उभे करू शकतो. यामध्ये दहिसर मतदारसंघात शिवसेना आपला उमेदवार उभा करून आपला गड पुन्हा एकदा काबीज तयारीत असेल. माजी शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांनी बांधलेला हा मतदारसंघ त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि नगरसेविका सून तेजस्वी घोसाळकर यांनी तशाच ताकदीने तो सांभाळला. खुद्द विनोद घोसाळकर आता ‘म्हाडा’चे सभापती झाले असले तरी ते अजूनही विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत आहेत. दहिसरमधून रिंगणात उतरण्याची त्यांची इच्छा आहे. युती झालीच नाहीतर तर मग मनीषा चौधरी विरुद्ध विनोद घोसाळकर अशी अटीतटीची परिस्थिती सुद्धा या मतदार संघामध्ये पाहायला पुन्हा एकदा मिळू शकते

युतीनंतर आघाडीबाबत बोलायचं झालं तर या मतदारसंघामध्ये आघाडीची पकड तुलनेने कमजोर आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे किंवा मग युवा नेतृत्वाला या मतदार संघामध्ये काँग्रेसकडून तिकीट दिलं जाण्याचीही शक्यता आहे. यामध्ये अभय चौबे  हे माजी नगरसेवक राजेंद्र प्रसाद चौबे यांचे चिरंजीव आमदारकीसाठी इच्छुक असल्याचा बोललं जातंय. तर दुसरीकडे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते चौथी प्रसाद गुप्ता आणि किशोर सिंह यांच्यात उमेदवारीसाठी चुरस असल्याची चर्चा आहे.

मात्र, यामध्ये कोणालाही फारसा अनुभव नसल्याने काँग्रेस नव्या चेहऱ्याला जरी उमेदवारी देण्याच्या तयारीत असली तरी युतीच्या उमेदवाराचे वजन या मतदारसंघामध्ये जास्त पाहायला मिळतंय. या ठिकाणी भाषिक मुद्यावर मतदान केलं जात असल्याने सुद्धा शिवसेना भाजपाला या ठिकाणी भरघोस मतदान मिळतं. मात्र, मनसे या निवडणुकांमध्ये जर आघाडीसोबत गेली तर मराठी भाषक मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा काही प्रमाणात आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो

त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत हा युतीचा गड जिंकायचा असेल तर एक वेगळी रणनीती आखून नाराज मतदाराला आपल्या बाजूने वळवायला हवं. यासाठी काँग्रेस कितपत तयारी करते आणि या निवडणुकीच्या रिंगणात उतरते हे काही दिवसातच कळेल.

दहिसर मतदार संघांची भौगोलिक स्थिती -

दहिसर मतदार संघ हा उत्तर मुंबईचा सर्वात शेवटचा मतदार संघ असून मूळचा ठाण्यात असलेला हा मतदार संघ 1956 मध्ये बोरीवली लोकसभा मतदार संघाला जोडला गेला. या लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा नक्कीच युतीच्या उमेदवाराला होतो. मराठी भाषिक लोक या भागात सर्वात जास्त असून उत्तर भारतीय आणि व्यापारी लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत.

२०१४ विधानसभा निवडणुकीचा निकाल

१) मनिषा चौधरी, भाजप – ७७,२३८
२) विनोद घोसाळकर, शिवसेना – ३८,६६०
३) शीतल म्हात्रे, काँग्रेस – २१,८८९
४) शुभा राऊळ, मनसे – १७,४३९
५) नोटा – १९०७