Karnataka Election Result : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण सवदी  (Laxman Savadi) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. लक्ष्मण सवदी यांनी भाजपच्या महेश कुमठळी यांचा पराभव केला आहे. लक्ष्मण सवदी यांनी निवडणुकीपूर्वी बंडखोरी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 


अथनी मतदारसंघातून लक्ष्मण सवदी यांनी भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला आहे. सवदी यांचा विजय हा भाजपसाठी धक्का असल्याचं मानलं जातंय. कारण लक्ष्मण सवदी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री होते. पण या निवडणुकीवेळी त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अथनीतून तिकीट मिळवलं.


भाजपचे उमेदवार महेश कुमठळी हे या आधी काँग्रेसमध्ये होते. 2018 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर उभ्या असलेल्या लक्ष्मण सवदी यांचा पराभव केला होता. पण 2019 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मंत्रीपद मिळवलं होतं. त्यामुळे यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळाल्याने लक्ष्मण सवदी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमधून उमेदवारी मिळवली. 


भाजप सोडताना लक्ष्मण सवदींची टीका 


भाजपचा राजीनामा देताना लक्ष्मण सवदी यांनी पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, भाजपच्या विविध नेत्यानी सातत्याने आपला अपमान केला आणि अनेक वर्षांपासून आपण तो सहन करत असल्याचं लक्ष्मण सवदी म्हणाले. विधानसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला तिकीट दिले नाही म्हणून भाजप सोडतोय असं काही नाही असं स्पष्ट करत ते म्हणाले की, मी यापुढे अपमान सहन करू शकत नाही म्हणून मी राजीनामा देत आहे.


आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना लक्ष्मण सवदी म्हणाले की, "मी आतापर्यंत शांतपणे सर्व अपमान सहन केले, कारण मला भाजपबद्दल खूप आदर आहे. मी भाजपला माझी आई मानत असून  एक दिवस आई आपल्या मुलाचे सांत्वन करेल असं मला आशा होती. पण तसं काही झालं नाही. मी पक्ष सोडत नाही तर मला तो सोडायला भाग पाडलं जात आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. 


विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी आपला पराभव करण्याचा कट रचला होता. भाजपकडे 126 मते आहेत. पण काही नेत्यांनी जनता दल (धर्मनिरपेक्ष) उमेदवाराशी हातमिळवणी केली आणि काही आमदारांचे क्रॉस व्होटिंग केले असा आरोप लक्ष्मण सवदी यांनी केला. 


ही बातमी वाचा: