Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Assembly Election 2023) निकाल काही वेळातच स्पष्ट होणार आहेत. निकालापूर्वीच्या कलानुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आज (13 मे) सकाळी 8 वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरु झाली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त जेडीएसमध्ये चुरशीची लढत होती.
कलांनुसार कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्याचं दिसतं. काँग्रेस इथे सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसने सत्ता स्थापन केली तर पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार आघाडीवर आहेत.
मात्र सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदावरुन त्यांच्यात आणि शिवकुमार यांच्यात मतभेद आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, "काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पण आपण दावेदार आहोत.
विशेष म्हणजे काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कधीच उघड न करण्याचा प्रघात काँग्रेसमध्ये आहे, विशेषत: कर्नाटकात. ही एक अतिशय लोकशाही प्रक्रिया आहे जी वर्षानुवर्षे सुरु आहे. बहुमत मिळवून पक्ष सत्तेवर आल्यास निवडून आलेले आमदार प्रथम आपलं मत मांडतील, त्यानंतर 'हायकमांड' निर्णय घेतील.
काँग्रेसला बहुमत मिळाल्यास सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीकेएस (DK Shivakumar) यांच्यातील मुख्यमंत्रिपदासाठीची लढाई तीव्र होईल, असं पक्षातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या एका आमदाराचे म्हणणं आहे की सिद्धरामय्या हे अधिक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे. तर डीकेएस हे आव्हान देणारे नेते आहेत आणि सोनिया गांधींचे ऐकतात. मात्र, अंतिम निर्णय 'हायकमांड'चाच असेल.
कोण आहेत सिद्धरामय्या?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, हे आज स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचा विजय झाला तर राज्यातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते सिद्धरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सिद्धरामय्या यांनी 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. आज म्हणजेच 13 मे रोजी निवडणूक निकालानंतर काँग्रेसने 113 जागा मिळवून बहुमत मिळवलं तर सिद्धरामय्या हे काँग्रेसची पहिली पसंती असू शकतात.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात "सामाजिक-आर्थिक सुधारणा योजनांमधून अनेक बदल घडवून आणले. त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना सुरु केल्या. सात किलो तांदूळ देणारी अन्न-भाग्य योजना, सर्व शालेय विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम दूध देणारी क्षीर-भाग्य योजना आणि इंदिरा कॅन्टीनमुळे राज्यातील गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील उपासमार, शिक्षण, स्त्री आणि बालमृत्यू यांच्याशी लढण्यासाठी योजना आणल्या, ज्यामुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यकाळात मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, महिलांसाठी पंचायत अनिवार्य करणे आणि गर्भधारणेनंतर 16 महिन्यांपर्यंत महिलांना पौष्टिक आहार उपलब्ध करुन देऊन महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या योजना आणल्या. मात्र सिद्धरामय्या यांनी त्यांच्या सरकारच्या काळात काही निर्णय घेतले होते ज्यामुळे ते लिंगायत, विशेषतः हिंदू मतदारांमध्ये त्याची लोकप्रियता घटली होती
कोण आहेत डीके शिवकुमार?
डीके शिवकुमार यांनी काल म्हणजेच 12 मे रोजी एक ट्वीट केलं होतं ज्यामधून त्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी सांगितल्याचे संकेत मिळत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी डीके शिवकुमार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या तीन वर्षांच्या मेहनतीचा ट्रेलरचा व्हिडीओ शेअर करुन मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे.
डीके शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवकुमार अनेक वर्षांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बाळगून आहेत. 2018 च्या निवडणुकीतही त्यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली होते.
कर्नाटकात दोन गट
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच दोन बलाढ्य गट आमनेसामने आले आहेत. पहिला गट ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा तर दुसरा गट डीके शिवकुमार यांचा आहे. दोन्ही नेत्यांचे समर्थक उघडपणे एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी या दोन्ही नेत्यांमधील चुरस आणखीच वाढली आहे.