Karnataka Elections: कर्नाटक विधानसभेचं (Karnataka Legislative Assembly) बिगुल वाजलं आहे. कर्नाटकात (Karnataka News) सध्या राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपनं (BJP) तर प्रचाराचा धुरळाच उडवला आहे. भाजपचे स्टार प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहा दिवसांत कर्नाटकात सुमारे 15 जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. ज्यामुळे राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे. पीएम मोदी 28 एप्रिलपासून कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करतील आणि 7 मेपर्यंत ते प्रचारसभा, रोड शो करणार आहेत. 


सहा दिवसांत 12-15 प्रचारसभा


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांत 12 ते 15 जाहीर सभा, रॅली आणि रोड शो करणार आहेत. पीएम मोदी 28 एप्रिल, 29 एप्रिल, 3 मे, 4 मे, 6 मे आणि 7 मे अशा 6 दिवसांसाठी प्रचार करणार आहेत. याच सहा दिवसांत पीएम मोदी 12 ते 15 रॅली, जाहीर सभा आणि रोड शो करतील.


स्टार प्रचारकांच्या यादीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचाही समावेश 


काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झालेले देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर ते कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. "पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांबाबत भाजप उत्साही आहे. कारण पंतप्रधान मोदींच्या आगमनाने भाजपच्या बाजूनं वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, कर्नाटक हे दक्षिणेकडील राज्य आहे, जिथे केवळ भाजपची सत्ता आहे.


कर्नाटकवर अधिक लक्ष


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक निवडणूक ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे. त्यामुळे भाजप इतर राज्यांपेक्षा कर्नाटकवर अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 2024 मध्येही भाजप एकहाती सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे 2024 ची फायनल मारण्यापूर्वी कर्नाटकची सेमीफायनल जिंकण्यासाठी भाजप पूर्णतयारीनिशी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. 


भाजपकडून निवडणूक प्रचार सुरू 


कर्नाटक हे भाजपचं 'दक्षिणेचं प्रवेशद्वार' असल्याचं सांगत पक्षाकडून प्रचाराची रुपरेखा आखण्यात आली आहे. कर्नाटकात भाजपसमोर सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे इतरही प्रमुख नेते कर्नाटकात जोरदार प्रचार करत आहेत. 


पंतप्रधान मोदी बेळगावीतून (Belagavi) फोडणार प्रचाराचा नारळ 


केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या प्रचाराची सुरुवात बेळगावी येथून करणार आहेत. कर्नाटकातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बेळगावी येथील चिकोडी, कित्तूर आणि कुडाचीला ते भेट देणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी उत्तरा कन्नड जिल्ह्यालाही भेट देणार आहेत. विशेष म्हणजे, कर्नाटकात एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.