ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं जुनं पारंपारिक कल्याण शहर आणि नव्यानं विकसित होत असलेलं कल्याण शहर यांची सांगड घालणारा मतदारसंघ. कधीकाळी बेतूरकर पाड्याच्या पुढे जंगल असलेल्या या शहराचा आज मात्र अगदी खडकपाडा, आधारवाडी आणि त्याही पुढे जाऊन बापगाव, टिटवाळ्यापर्यंत विस्तार झाला आहे.  साहजिकच कल्याण पश्चिमेची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या वाढीव लोकसंख्येला पुरेशा सोयीसुविधा पुरवण्यासाठी यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात अरुंद पूल, अपुरं पडू लागलेलं डम्पिंग ग्राउंड अशा अनेक समस्या कल्याण पश्चिमेला भेडसावू लागल्या आहेत. सुदैवाने आजवर कल्याण पश्चिमेला लाभलेल्या आमदारांनी या समस्या विधिमंडळात, सरकार दरबारी लावून धरल्या आहेत. त्यामुळे या समस्या एका रात्रीत जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे दूर होणं शक्य नसलं, तरी टप्प्याटप्प्यानं नक्कीच कमी होतील, अशी आशा कल्याण पश्चिमेच्या रहिवाशांना आहे.


कल्याण पश्चिम मतदारसंघाची निर्मिती ही 2009 साली झाली. त्यापूर्वी या मतदारसंघाचा बहुतांशी भाग हा डोंबिवली विधानसभेत, तर काही भाग हा अंबरनाथ मतदारसंघात होता. 2009 साली या मतदारसंघाची निर्मिती झाली त्यावेळी राज्यात सर्वत्र मनसेची जोरदार हवा सुरू होती. त्यातच परप्रांतीयांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची पहिली ठिणगी कल्याण शहरात पडली, कारण रेल्वेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना कल्याणच्या मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात घुसून पिटाळून लावलं होतं. हे आंदोलन हिंसक झाल्यानंतर मनसेच्या भूमिकेला मोठं पाठिंबा मिळाला. त्यातच मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष प्रकाश भोईर यांना मनसेची कल्याण पश्चिम विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्याविरोधात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र देवळेकर होते. मात्र भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष मंगेश गायकर यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली आणि त्याचा सरळ फायदा मनसेच्या प्रकाश भोईर यांना झाला. त्यावेळी प्रकाश भोईर यांना 41 हजार 111 मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजेंद्र देवळेकर यांना 35 हजार 562 मतं मिळाली. शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र देवळेकर यांचा पाच हजार 549 मतांनी पराभव झाला. बंडखोरी करून अपक्ष लढलेल्या मंगेश गायकर यांना तब्बल 22 हजार 139 मतं मिळाली. कॉंग्रेसच्या अलका आवळसकर यांनीही या निवडणुकीत 32 हजार 496 मते घेतली. भाजपच्या बंडखोरीमुळे 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला हे उघड असलं, तरी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीही याच काळात उफाळून आली होती, अन्यथा साडेपाच हजार मतं आम्हाला कशीही मिळालीच असती, असं दावा जाणकार आणि शिवसेनेचे जुने कार्यकर्ते  करतात.

यानंतर 2014 सालच्या निवडणुकीत मात्र शिवसेना भाजपची युती तुटली आणि शिवसेनेच्या हक्काच्या मतदारसंघात भाजपनेही उपमहापौर राहिलेल्या नरेंद्र पवार यांच्या रूपाने उमेदवार दिला. तर शिवसेनेनं तत्कालीन शहरप्रमुख विजय साळवी यांना उमेदवारी दिली. मात्र चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पवार यांनी 54 हजार 388 मते घेत विजय मिळवला. तर शिवसेनेच्या विजय साळवी यांना 52 हजार १६९ मतं मिळाली आणि त्यांचा दोन हजार 219 मतांनी पराभव झाला. विशेष म्हणजे त्यावेळी आमदार असलेले मनसेचे प्रकाश भोईर हे या निवडणुकीत 20 हजार 649 मतं घेत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. कॉंग्रेसच्या सचिन पोटे यांना या निवडणुकीत 20 हजार 160 मतं मिळाली. याही निवडणुकीत शिवसेनेच्या बंड्या साळवी यांचा पराभव होण्यामागे पक्षातील अंतर्गत गटबाजीच कारणीभूत असल्याची चर्चा अजूनही कल्याणमध्ये होत असते.

मागील दोन निवडणुकीत हातातोंडाशी आलेला घास भाजपने हिरावून घेतल्याची भावना कल्याणच्या निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीदरम्यानच काही शिवसैनिकांनी विधानसभेसाठी कल्याण पश्चिम देणार असाल, तरच लोकसभेला भाजपचं काम करू, अशी उघड भूमिका घेतली होती. त्यावेळी तात्पुरती समजून काढून वेळ मारून नेण्यात आली, मात्र आता विधानसभेचे वारे वाहू लागल्यानंतर यंदा युती झाली, तर कल्याण पश्चिम मतदारसंघ हा २००९ च्या फॉर्म्युलानुसार आम्हालाच द्यावा, अशी आग्रही भावना शिवसैनिकांमध्ये आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सकारात्मक घडामोडी घडतात का? हे देखील पाहावं लागेल. केवळ ठाणे जिल्ह्यातील जागांची वाटणी करण्यासाठी म्हणून जर कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेच्या कोट्यात आली, तर कदाचित पालघरच्या गावित फॉर्म्युलानुसार भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार हेच भगवा खांद्यावर घेऊन लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेनेतल्या इच्छुकांचे मनसुबे मात्र उधळले जाऊ शकतात. शिवाय स्वतः पवार हे देखील आम्ही ‘आदेश’ पाळू असं सांगत असल्यानं शिवसैनिकांची धाकधूक मात्र वाढली आहे.

गणेशोत्सव संपताच कधीही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यातच युती होते की नाही, याचीदेखील अजूनही शाश्वती नाही. त्यानंतरही युती झालीच, तर जागावाटपाची चर्चा, तडजोडी या सगळ्यात कल्याणकरांची उत्सुकता मात्र ताणली जाणार आहे. मात्र युतीधर्म पाळायचा झाला, तर यंदा कल्याण पश्चिमेवर भगवा फडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हा भगवा खांद्यावर घेऊन आमदार कोण होणार? हे जाणून घेण्यासाठी मात्र काही दिवसांची प्रतीक्षा करावीच लागणार आहे.