आदिवासी राखीव असलेल्या कळवण मतदारसंघात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुक लढवण्यास इच्छूक असलेल्यांची अनेक नावे सध्या चर्चेत येऊ लागली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळातच मतदार संघात अनेक पक्षांची रंगीत तालीम पहावयास मिळाली होती. लेकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी झाल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती-आघाडी-माकप अशी तिरंगी लढत मात्र अटळ आहे. मकपाचे विद्यमान आमदार हे पुन्हा बाजी मारणार का याकडे लक्ष लागले आहे.
पूर्वी कळवण मतदारसंघात दिवंगत ए. टी. पवार यांचे एकहाती वर्चस्व होते. त्यामुळे तब्बल नऊ वेळा ए. टी. पवार हे या मतदारसंघातून निवडून आले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असा त्यांचा प्रवास राहिला. 1995 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत ते मंत्रीही झाले होते.
ए. टी.पवार यांनी आपल्या आमदारकीच्या काळात अनेक विकासाची कामे केली. पुनंद धरणाची निर्मिती त्यांच्या काळातच झाली. तर शासकीय इमारतींसह अनेक विकासकामे करत त्यांनी कळवण मतदारसंघात आपली छाप पाडली. या मतदारसंघात पवारांचे मोठे योगदान आहे. तर सुरगाणा मतदार संघात माकपाच्या जे. पी. गावितांनी आदिवासींसाठी केलेल्या कामांमुळे आणि त्यांना दुसरा तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्याने जे. पी. गावित सतत येथून सातवेळा निवडूण आले आहेत.
2009 साली मतदार संघाची पुर्नरचना झाल्यानंतर कळवण-सुरगाणा मतदार संघ एक झाला तर पेठ हा दिंडोरी मतदार संघात समाविष्ठ करण्यात आला. त्यामुळे हक्काच्या मतदारांची फाटाफुट झाली आणि पवार विरुद्ध गावित अशी दोन विद्यमान आमदारांमध्ये त्यावेळी लढत झाली. या लढतीत ए.टी.पवार विजयी झाले.
2014 साली मात्र कळवण-सुरगाणा मतदारसंघात वेगळेच चित्र पहावयास मिळाले. जे.पी.गावित यांनी पवार यांना घेरण्यासाठी कळवण मधूनच उमेदवार उभे केले. त्यामुळे सुरगाणा या त्यांच्या बालेकिल्ल्यातील एकगठ्ठा मतदान त्यांच्या पारड्यात पडले. परिणामी कळवणमध्ये पवारांची मतं विभागली गेली. त्यामुळे अवघ्या काही मतांनी जे.पी.गावित यांचा विजय झाला.
2014 विधानसभा निवडणूक निकाल
जे. पी. गावीत - माकप - 67,795 मतं
ए. टी. पवार - राष्ट्रवादी - 63,009 मतं
यशवंत गवळी - भाजप - 25,457 मतं
भरत वाघमारे - शिवसेना - 9,024 मतं
डी. के. गांगुर्डे - कॉंग्रेस - 5,699 मतं
येत्या विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून ए. टी. पवार यांचे थोरले सुपुत्र नितीन पवार यांची उमेदवारी ही पक्की समजली जात आहे. मात्र आघाडीत माकपचा समावेश झाल्यास नितीन पवार युतीकडून उमेदवारी घेऊ शकतात. जागावाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर पवार कुटूंबातून वेगळा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. भाजपाकडून एन. डी. गावित किंवा माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा मुलगा समीर चव्हाण हे दावेदार आहेत. शिवसेनेकडून मोहन गांगुर्डे यांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे आमदार जे. पी. गावितांना टक्कर देण्यासाठी तेवढाच तुल्यबळ उमेदवार असणे गरजेचे आहे. त्यामुळे नितीन पवार युतीकडून निवडणूक लढविणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार जे. पी. गावित यांच्या जमेच्या बाजू
वनजमिनी प्रश्नी काढलेला लाँग मार्च, सुरगाणा तालुका माकपाचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. रेशनकार्डप्रकरणी केलेले आंदोलन, पुनंद धरणातून सटाणा शहराला करण्यात येत असलेल्या थेट पाईप लाईन योजनेला केलेला विरोध आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांशी असलेला थेट संपर्क या गावितांच्या जमेच्या बाजू आहेत.
तर कळवण तालूक्यातील विविध संस्थांवर राष्टवादीचं वर्चस्व, स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात तसेच ए. टी.पवार यांना मानणारा मोठा वर्ग या राष्ट्रवादीच्या जमेच्या बाजू आहेत.
बहुजन वंचित आघाडीचा मोठा फॅक्टर लोकसभेत पहावयास मिळाला होता. तो विधानसभेत पुन्हा दिसल्यास त्याचा फटका कोणाला बसतो? हे निवडणुकीत दिसेल. त्यामुळे कळवण-सुरगाणा मतदार संघात माकपाचे जे. पी. गावित पुन्हा निवडणून येतात की मतदार संघात बदल होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कळवण मतदारसंघ | जे. पी. गावित गड राखणार का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2019 11:35 PM (IST)
आदिवासी राखीव असलेल्या कळवण मतदारसंघात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुक लढवण्यास इच्छूक असलेल्यांची अनेक नावे सध्या चर्चेत येऊ लागली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -