Kalamnuri Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा बहुपक्षीय लढाया पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये 288 विधानसभा मतदारसंघात आमने-सामने असणार आहेत. याशिवाय प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरेंची मनसे, एमआयएम आणि तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात तिरंगी आणि चौरंगी लढती पाहायला मिळत आहे.


कळमनुरी मतदारसंघात काय होणार? 


हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आहे, त्यातील हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदार संतोष बांगर यांना उमेदवारी दिली आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेने संतोष टारफे यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशा लढतीत कोण बाजी मारणार? हे पाहणे सर्वांसाठी औत्सुक्याचे ठरले आहे. 


मुख्यमंत्री शिंदेंनी बंड केल्यानंतर 40 आमदार गुवाहाटीला गेले होते. मात्र, संतोष बांगर गुवाहाटीला न जाता उद्धव ठाकरेंसोबत राहूया असं आवाहन करत होते. निष्ठेचा नांगर संतोष बांगर अशा घोषणाही संतोष बांगर यांनी दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी संतोष बांगर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. त्यामुळे ठाकरेंनी आता संतोष टारफे यांना मैदानात उतरवत बांगर यांच्या पराभवासाठी रणनिती आखली आहे. शिंदे आणि ठाकरे दोघांनीही आपल्या कळमनुरीतील उमेदवारांसाठी सभा घेतल्या आहेत. मात्र, यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?


2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर विरुद्ध काँग्रेसचे संतोष टारफे यांच्यामध्ये लढत झाली होती. या लढतीत संतोष बांगर यांनी विजय मिळवला होता. मात्र, महत्त्वाचं म्हणजे संतोष टारफे यांच्यापेक्षा वंचितचे उमेदवार अजित मगर यांनी जास्त मतं मिळवली होती. संतोष बांगर यांनी जवळपास 16 हजार मतांनी विजय मिळवला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं


Laxman Hake: देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्रीपदाला विरोध का? एकवेळ भाजपला मतदान करु, पण तुतारीला नाही: लक्ष्मण हाके