Justice Chandiwal On Devendra Fadnavis: सचिन वाझेने (Sachin Waze) शपथपत्रात अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. तसेच सचिन वाझे आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नावही गुंतवण्याचा प्रयत्न झाला असा गौप्यस्फोट न्या. चांदीवाल (Justice Chandiwal) यांनी केला आहे. एबीपी माझाचे ज्येष्ठ प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी न्या. चांदीवाल यांची EXCLUSIVE मुलाखत घेतली... या मुलाखतीत न्या. चांदीवाल यांनी स्फोटक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केलेत. योग्य पुरावे आयोगासमोर समोर येऊ दिले नाहीत असं न्या. चांदीवाल यांनी म्हटलं आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण अनिल देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाहीय, असंही स्पष्ट केलं आहे. तसेच अनिल देशमुख आणि सचिन वाझेकडून देवेंद्र फडणवीसांचं नावंही गुंतवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं लक्षात येताच आम्ही हे रेकॉर्डवर घेतलं नाही. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःच्या प्रसिद्धीचा मिळवायचा प्रयत्न दिसत होता, मात्र मी ते होऊ दिलं नाही, असे न्यायमूर्ती चांदिवाल यांनी सांगितले.
सचिन वाझे कधीकधी त्यांच्या वकिलांनाही जुमानत नव्हते- न्यायमूर्ती चांदीवाल
सचिन वाझे यांनी चौकशीवेळी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचा एक व्हॉटसअॅप मेसेज दाखवला होता. त्यामध्ये 40 लाख रुपयांचा उल्लेख होता. तसं बघायला गेलं तर सचिन वाझे यांच्याकडे भरपूर मटेरियल होते. पण ते ज्या पद्धतीने वागायचे, ते कधीकधी त्यांच्या वकिलांनाही जुमानत नव्हते. सचिन वाझे अत्यंत हुशार आणि चाणाक्ष माणूस होता, असे जस्टिस चांदीवाल यांनी म्हटले.
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही- न्यायमूर्ती चांदीवाल
अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिलेली नाही. मी माझ्या अहवालात क्लीनचीट हा शब्दच वापरला नाहीय. परमबीर सिंह यांनी जी माघार घेतली, त्याबद्दल मी माझ्या अहवालात टीका केली आहे. पण मी क्लिनचीट दिलेली नाही. साक्षी पुरावा आला नाही. अहवालात पुरावा नाही असं म्हटलं आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाही. पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असतं, असं चांदीवल यांनी म्हटलं आहे.