Jharkhand election 2024 रांची : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांमधील घडामोडी वाढल्या आहेत. झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेससह मित्र पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. झारखंडमध्ये भाजप विरोधी पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जागा वाटपावर चर्चा करण्यात येत आहेत. झारखंडमधील एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आहे.


भाजपचा मित्र पक्षांसह झारखंडची विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. या राज्यात त्यांच्यासोबत जदयू, लोक जनशक्ती पार्टी रामविलास आणि आजसू हे पक्ष आहेत. या पक्षांसोबत भाजपच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.   


भाजप 69 जागा लढवण्याची शक्यता


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 69 जागांवर निवडणूक लढवेल. जदयूला 2 जागा, आजसूला 9 जागा मिळतील. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास पार्टीला एक जागा मिळू शकते. मित्र पक्षांची अजून काही जागा मिळण्यासंदर्भात मागणी आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.  एनडीएच्या घटकपक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरं गेल्यास गेल्या निवडणुकीपेक्षा चांगलं यश मिळेल आणि सरकार स्थापनेची संधी मिळेल, असं एनडीएतील पक्षांना वाटत आहे. 


भाजपकडून पहिली यादी लवकरच


निवडणूक आयोगानं 15 ऑक्टोबर रोजी  निवडणूक जाहीर केली आहे. भाजपची केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठका देखील झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीला कुणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात भाजप नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. भाजप येत्या काही दिवसांमध्ये पहिली यादी जाहीर करेल. त्यानंतर एनडीएतील मित्रपक्ष त्यांचे उमेदवार जाहीर करतील.


झारखंडमध्ये 2019 ला काय घडलेलं?


2019 च्या विधानसभा निवडणुकीत  झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार आलं होतं. झारखंड मुक्ती मोर्चानं 30 जागा जिंकल्या होत्या.काँग्रेसनं 16 जागा जिंकल्या होत्या. भाजपनं 25 जागा जिंकल्या होत्या. हेमंत सोरेन यांच्यासमोर राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचं आव्हान असेल. तर, दुसरीकडे भाजप देखील सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.  झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्या काळात चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. तर, हेमंत सोरेन जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री बनले. चंपई सोरेन यांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.


इतर बातम्या :


छोट्या झारखंडमध्ये दोन टप्प्यात तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक का? निवडणूक आयुक्तांनी एका वाक्यातच सांगितलं