वंचित विकास आघाडीकडून जयसिंगराव रिंगणात, धनगर मतांमध्ये फूट पडण्याची चिन्हं
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2019 01:27 PM (IST)
जयसिंगराव शेंडगे हे वसंतदादा पाटील यांच्या काळातील माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचे पुतणे आहेत. शेंडगे हे सांगली जिल्ह्यातील धनगर समाजातील नेत्यांपैकी एक प्रमुख आणि जेष्ठ चेहरा आहे.
सांगली : वंचित विकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरु झाली आहे. सांगलीतून जयसिंगराव शेंडगे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जयसिंगराव शेंडगे हे वसंतदादा पाटील यांच्या काळातील माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचे पुतणे आहेत. शेंडगे हे सांगली जिल्ह्यातील धनगर समाजातील नेत्यांपैकी एक प्रमुख आणि जेष्ठ चेहरा आहे. शेंडगे यांनी 2004 मध्ये कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. शेंडगे यांचा आजपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता प्रकाश आंबडेकर यांच्या नेतृत्वाखालच्या वंचित आघाडीपर्यंत प्रवास राहिला आहे. शेंडगेंच्या उमेदवारीमुळे धनगर समाजाकडून अन्य पक्षाच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांमध्ये काही प्रमाणात फूट पडू शकते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना शेंडगेंच्या उमेदवारीचा तोटा होऊ शकतो.