मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये दिग्गज अभिनेते मनोज जोशी हे भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मोदींच्या राजकीय प्रवासात अमित शाह यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे शाहांची व्यक्तिरेखा कोणता कलाकार साकारणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.


'पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात अमित शाहांची भूमिका करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. निर्माते संदीप सिंग यांनी भूमिकेसाठी विचारणा करताच, मी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. ही अत्यंत रंजक भूमिका होणार आहे' अशा भावना मनोज जोशींनी व्यक्त केल्या.

मनोज जोशी यांनी मराठीसोबतच हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर विपुल काम केलं आहे. त्यांनी हंगामा, हलचल, फिर हेराफेरी, भागमभाग, चुप चुपके, गोलमाल, गरम मसाला, भूलभुलैया यासारख्या चित्रपटांमध्ये केलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या आहेत. दशक्रिया या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

1990 साली टीव्हीवर गाजलेल्या 'चाणक्य' मालिकेत त्यांनी केलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. आभाळमाया मालिकेत त्यांनी साकारलेली शरद जोशीची भूमिका गाजली होती. नुकतंच 'होणार सून मी या घरची' या मालिकेत त्यांचं दर्शन घडलं होतं.

चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहेत. टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटात जशोदाबेन यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका करणार असून मनोज जोशींसोबत बमन इराणी, ​झरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय, प्रशांत नारायणन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत असतील.

सरबजीत, मेरी कोम सारख्या चरित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचं पोस्टर 7 जानेवारीला 23 भाषांमध्ये लाँच करण्यात आलं होतं.

मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील कोणकोणत्या बाबींवर प्रकाशझोत टाकला जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकांच्या आधी हा सिनेमा रिलीज होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.