जळगाव: राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर (Muktainagar) विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर एकनाथ खडसे यांनी एकहाती वर्चस्व मिळवल्याचं चित्र आहे. या ठिकाणी एकूण 13 पैकी 12 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटी यांचा हा मतदारसंघ असून त्यांना एकाही ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला नाही. 


ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर (Jalgaon Gram Panchayat Election) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, भाजप शिंदे गटाला  या निवडणुकीत जनतेने नाकारल आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हा मतदारसंघ असताना एकही ग्रामपंचायतीवर त्यांना विजय मिळवता आलेला नाही. या निकालातून जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभी असल्याचे स्पष्ट झालं आहे.


Jalgaon Gram Panchayat Election Results: जळगाव 122 ग्रामपंचायत निकाल अपडेट


राष्ट्रवादी काँग्रेस : 55


भाजप : 33


शिंदे गट : 16


काँग्रेस : 10


उद्धव ठाकरे गट : 4


इतर : 4


एकूण :- 122


जळगावात निकालानंतर झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू 


ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर विजयी व पराभूत असे दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येवून वाद होऊन हाणामारी व दगडफेक झाली. या  दगडफेकीत विजयी उमेदवाराच्या भावाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.


माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा मुलगा ग्रामपंचायतीमध्ये पराभूत  


अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणूक ही लक्षवेधी निवडणूक होती.या निवडणुकीत भाजप आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते आणि बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांच्यात लढत झाली. या लढतीत साजन पाचपुते यांचा विजय झाला असून, हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का मनाला जात आहे. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचपुते कुटुंबात फूट पडल्याचे पाहायला मिळाली. दरम्यान साजन पाचपुते यांनी सर्व काष्टी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांच्या निधनानंतर माझ्या आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक होती, माझ्या विरोधात सर्व मोठे नेते एकत्र झाले होते, मात्र सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहिली अशी भावना यावेळी साजन पाचपुते यांनी व्यक्त केली.