आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आंध्र प्रदेशमध्ये तेलुगु देसम पार्टीच्या (टीडीपी)प्रचारासाठी फारुक अब्दुल्ला दाखल झाले आहेत. आज (मंगळवार)टीडीपीच्या प्रचारासाठी कडप्पा जिल्ह्यात टीडीपीने एका रोड शोचे आयोजन केले होते. यावेळी अब्दुल्ला बोलत होते. या रोड शोमध्ये अब्दुल्ला यांनी केलेल्या विधानामुळे आंध्र प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले आहे.
अब्दुल्ला म्हणाले की, मला जगन मोहन यांना आठवण करुन द्यायची आहे की, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर काय वक्तव्य केले होते. वडीलांच्या निधनानंतर जगन मोहन मला येऊन म्हणाले की, जर काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री बनवले तर ते काँग्रेसला 1 हजार 500 कोटी रुपये देतील. या विधानानंतर फारूक अब्दुल्ला यांनी जगन मोहन यांच्याकडे इतका पैसा कसा आला याची चौकशी करण्याचीदेखील मागणी केली.
2 सप्टेंबर 2009 रोजी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. त्यावेळी काँग्रेसचे अनेक बडे नेते मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत होते. वायएसआर यांचे चिरंजीव जगन मोहन रेड्डी यांनीदेखील प्रयत्न केले होते. अखेर सत्ताधारी काँग्रेसने एन. के. रोसैया यांना मुख्यमंत्री बनवले. मुख्यमंत्रीपद न दिल्याने जगन मोहन काँग्रेसवर नाराज झाले आणि त्यांनी वायएसआर काँग्रेस नावाचा नवीन पक्ष स्थापन केला.