Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : दिवाळीचा सण पार पडल्यानंतर काल महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरमधून (Kolhapur) करण्यात आला. कोल्हापूरमधून प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा ही शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत कोल्हापूरमधून प्रचाराचा नारळ फोडला. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार हातकलंगलेमधील अशोकराव माने आणि शिरोळमधील अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी भव्य सभा पार पडल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के पी पाटील यांच्यासाठी आदमापुरत सभा झाली. 


प्रचाराचा शुभारंभ होत असल्याने दोन्ही नेत्यांच्या सभांकडे अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या राज्याचे लक्ष होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार आणि महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे लक्ष होते. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा करवीर निवासिनी अंबाबाई आणि आदमापुरात बाळूमामांचे दर्शन घेतल्यानंतर के पी पाटील यांच्यासाठी सभा घेतली. या सभेला आमदार सतेज पाटील आणि शाहू महाराज सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे कोल्हापूरच्या उत्तरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टायमिंग साधताना सतेज पाटील व्यासपीठावर समोर बोलावत यावेळी ते सोबत असल्याचे सांगितले. तसेच केपींच्या विजयाची जबाबदारी सुद्धा दिली. 


ठाकरे अन् शिंदेंकडून घोषणांचा पाऊस


यावेळी ठाकरे यांनी बोलताना फुटलेली शिवसेना, गेल्या पाच वर्षातील राजकीय घटनांचा आढावा घेतानाच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काय करणार? याची सुद्धा माहिती दिली. यावेळी पाच महत्त्वाच्या घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्या. यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलिसांची भरती हा सुद्धा प्रामुख्याने मुद्दा होता. ठाकरे म्हणाले की, पोलिस ठाण्यात गेल्यानंतर महिलांना कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेली पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल. 



  • त्याचबरोबर पाच जीवनावश्यक वस्तूंचे म्हणजेच डाळ, तांदूळ, साखर, तेल या वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल.

  • राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल.

  • मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे देऊ. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना सांगितले.

  • राज्यातील शेतकऱ्यांना मविआची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल.

  • आमचं सरकार पडलं नसतं तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. पण आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.


ठाकरेंच्या घोषणेनंतर शिंदेंकडून मोठी घोषणा


दरम्यान, ठाकरे यांनी महिला सुरक्षांसाठी महिला पोलिसांची स्वतंत्र भरती करणार असल्याची जाहीर करताच संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यांनी सुद्धा दहा मोठ्या घोषणा कोल्हापुरातून केल्या. डाळ, तांदूळ, साखर, तेल या वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल, असे ठाकरे यांनी सकाळी जाहीर केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार असल्याचे जाहीर केले.


  महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 कलमी कार्यक्रम मतदारांसमोर सादर करत प्रचाराचे रणशिंग फुंकले.  



  • राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही 2100 रुपये, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती.

  • शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15हजार रुपये. 

  • प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.

  • वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.

  • जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.

  • राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.

  • 45 हजार पांदण रस्ते बांधणार.

  • अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन.

  • वीज बिलात 30 टक्के कपात.

  • शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार.


त्यामुळे आधीच आपल्या 'घोषणाग्रस्त' झालेल्या कोल्हापूरमध्ये एक प्रकारे दोन्ही बाजूने घोषणांचा अवघा महापूरच आल्याचे दिसून आले. कोल्हापुरात रस्ते विकासासाठी कोटींच्या कोटींचे बॅनर्सने लक्ष वेधून घेतले. गुडघाभर खड्डयातून वाट काढताना बॅनर्स बघून शहरवासियांना किती यातना झाल्या असतील, याचाही विचार बॅनर्स लावणाऱ्यांमध्ये दिसून आला नाही. कोल्हापुरातील रस्त्यांच्या निधीबाबत केलेले दावे पाहून कोल्हापूरचे सिंगापूर होऊन गेले, असते, अशी सुद्धा प्रतिक्रिया उमटली होती.