Up Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत. उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी पाचव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी जोरात प्रचार सुरू आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी 403 पैकी 325 जागा भाजपला मिळणार असल्याचा दावा केला आहे. भाजप एक दमदार आणि मजबूत सरकार देणार असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. जे तुमच्या सुख-दु:खात सहभागी नाहीत, त्यांना डोक्यावर घेण्याची काय गरज आहे? त्यांना विसर्जित करण्याची गरज आहे. असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार निशाणा लगावला. समाजवादी पार्टीच्या सरकारच्या काळात रामभक्तांवर गोळ्या झाडल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. आज संपूर्ण जगाचे लक्ष अयोध्येकडे लागले आहे. अयोध्येत पुढच्या वर्षी भव्य राम मंदिर तयार होईल असेही ते म्हणाले. सत्तेत आल्यानंतर समाजवादी पार्पटीने हिला निर्णय घेतला तो दहशतवाद्यांवर असलेले खटले मागे घेण्याचा. सपाचा हात दहशतवाद्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप देखील योगी आदित्यनथ यांनी केला.
तुम्हाला आठवत असेल, मी पाच वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा राम मंदिर बांधू, असे सांगितले होते. त्याचे काम आता सुरू आहे. सपा, बसपाच्या सरकारमध्ये असे घडले असते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. आमच्या सरकारने कोरोनाच्या काळात सर्वांना मोफत लस दिली, वीज देताना भेदभाव केला नाही, रेशनही दिले, लोकांना घरे दिली, लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात राज्यातील 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभेच्या जागांसाठी 23 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात एकूण 624 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान होणाऱ्या नऊ जिल्ह्यांमध्ये पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनौ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर यांचा समावेश आहे. राज्यात झालेल्या 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या 59 पैकी 51 जागांवर विजय मिळवला होता. चार जागांवर समाजवादी पक्ष आणि तीन जागांवर बहुजन समाज पक्षाने विजय मिळवला होता. भाजपचा मित्रपक्ष अपना दल या पक्षाने एक जागा जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या: