UP Election 2022 :  विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या वेगवेगळ्या पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा सुरू आहेत. राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, उद्या उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. उद्या जरी मतदन होणार असले तरी पाचव्या टप्प्यासाठी प्रचार जोरात सुरू आहे. पाचवा टप्पा 27 फेब्रुवारीला होणार असून, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जाहीर सभा घेणार आहेत. आज पंतप्रधान बहराइचमध्ये जाहीर सभेला संबोधीत करणार आहेत. तर दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही आज जाहीर  सभा घेणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तर प्रदेशातील बहराइचमधील पायगपूरच्या शिवदहा मोर मैदानावर दुपारी 3.35 वाजता जाहीर सभेला संबोधीत करतील. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रतापगड आणि प्रयागराजमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. ते प्रयागराजमध्ये रोड शो देखील करणार आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आज देवरिया आणि बलिया येथे जाहीर सभा घेणार आहेत. संध्याकाळी गोरखपूरमध्ये पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक होणार आहे. त्याचवेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज यूपीमध्ये 3 जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.


अखिलेश प्रयागराज, चित्रकूट आणि कौशांबीच्या दौऱ्यावर 


समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आज प्रयागराज, चित्रकूट आणि कौशांबीच्या निवडणूक दौऱ्यावर आहेत. प्रयागराज जिल्ह्यातील अंताहिया माजरा गडवा खुर्द, मिर्झापूर मार्ग, करचना येथे अखिलेश यांची कामगार परिषद आहे. तर बहूजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती या आज उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या, गोंडा, बहराइच आणि बाराबंकीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. दुसरीकडे, भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आज प्रतापगडच्या निवडणूक दौऱ्यावर असून, तेथे कार्यकर्ते संवाद, संघटनात्मक बैठक, जनसंपर्क आणि जाहीर सभा घेणार आहेत.


आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज गोरखपूरच्या सहजनवा, संत कबीरनगरच्या खलीलाबाद आणि बस्तीच्या रुधौली मतदारसंघात जाहीर सभा घोणार आहेत. सकाळी 11 वाजता ते गोरखपूर विमानतळावर पोहोचतील. ते मुरारी इंटर कॉलेज, सहजनवा येथे जाहीर सभेला संबोधीत करतील.