लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आंबेडकर यांची नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथे पहिल्यांदाच जाहीर सभा झाली. हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा होती.
"नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत हे मला माहित आहे. आमचं सरकार आलं तर या जुन्या नोटा बदलून देण्यात येतील, असं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिलं. "मात्र या चोरांचं सरकार पुन्हा येऊ देऊ नका," असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे आंबडेकर यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली.
असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर राज्यातील सर्व 48 जागा लढवणार आहेत. केवळ औरंगाबादच्या जागेवर एमआयएमचे इम्तियाज जलिल निवडणूक लढवतील, उर्वरित जागा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढवणार आहेत. स्वत: प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत.