मुंबई : मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या रणांगणात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची विजयी घोडदौड अखेर चौथ्या सामन्यात रोखली. मुंबईनं चेन्नईचा 37 धावांनी पराभव करुन यंदाच्या मोसमातला दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात मुंबईनं चेन्नईसमोर विजयासाठी 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईच्या अचूक माऱ्यासमोर चेन्नईला आठ बाद 133 धावांचीच मजल मारता आली.


मुंबईनं दिलेल्या 171 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांचा मुंबईच्या गोलंदाजीपुढे निभाव लागला नाही. केदार जाधवनं 58 धावांची एकाकी झुंज दिली. सलमीवीर अंबाती रायडू शुन्यावर तर शेन वॉटसन अवघ्या 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर सुरेश रैना 15 धावांवर आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी अवघ्या 12 धावांवर बाद झाला. मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि लसिथ मलिंगानं प्रत्येकी तीन तर जेसन बेहरेनडॉर्फनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.


त्याआधी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबईला सुरुवातीलाच दोन झटके बसले. सलमीवीर क्विंटन डिकॉक (4) आणि कर्णधार रोहित शर्मा (13) स्वस्तात माघारी परतले. त्यामनंतर आलेल्या सूर्यकुमार यादव 59 धावांची खेळी करत मुंबईला सावरलं. कृणाला पंड्याने 42 धावा करत सूर्यकुमारला चांगली साथ दिली.


मात्र हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्डच्या फटकेबाजीमुळे मुंबईनं 20 षटकांत पाच बाद 170 आव्हान चेन्नई समोर ठेवलं. हार्दिकने अवघ्या 8 चेंडूत तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 25 धावा केल्या. तर पोलार्डनेही अवघ्या 7 चेंडून 17 धावा केल्या.