चंदीगड : हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीसाची (Haryana Vidhan Sabha Election Result) मतमोजणी केली जात आहे. पुढच्या अवघ्या काही तासांत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. सध्या हरियाणा ठिकठिकाणी मतमोजणी चालू आहे. दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस दमदार आघाडी घेतली होती. आता मात्र भाजपाने मुसंडी मारली आहे. या राज्यात मतांच्या टक्केवारीचा अजब खेळ चालू आहे. 


मतमोजणीत नेमकं काय घडतंय? 


हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निकालाचा परिणाम महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरही लागू शकतो. म्हणूनच भाजपा तसेच काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. मतमोजणी चालू झाली तेव्हा काँग्रेसने दमदार आघाडी घेतली होती. आता मात्र भाजपाने मुसंडी मारली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेस तब्बल 60 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर होता. तर भाजपाची आघाडीच्या मतदारसंघांची संख्या अगदी 20 च्या खाली होती. 


भाजपाने घेतली आघाडी, काँग्रेस पिछाडीवर 


मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्यांतील कलानुसार हरियाणात सत्तापालट होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे मतदान संपल्यांतर एक्झिट पोलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हरियाणात काँग्रेसची सत्ता येणार, असा अंदाज लावला जात आहे. सध्या मात्र मतमोजणीतून समोर येत असलेले आकडे वेगळेच गणित माडंत आहेत. दुपारनंतर भाजपाने काँग्रेसला धोबीपछाड देत थेट आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या कलानुसार भाजपा बहुमताचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. 


कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? 


भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हरियाणातील निवडणुकीचा निकाल दाखवला जात आहे. या माहितीनुसार काँग्रेस सध्या 35 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाने सध्या 49 जागांवर आघाडी घेतली आहे. बीएसपी पक्षाचा एक उमेदवार आघाडीवर आहे. आयएनएलडी एका जागेवर आघाडीवर आहे. अपक्ष चार उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांतून आघाडीवर आहेत. 


मतांच्या टक्केवारीचा नेमका खेळ काय? 


आतापर्यंतच्या निवडणूक निकालानुसार हरियाणातील निवडणुकीत अजब खेळ चालू आहे. भाजपा साधारण 12 जागांवर पुढे आहे. मात्र भाजपाला आतापर्यंत मिळालेली मते ही काँग्रेसच्या तुलनेत कमी आहेत. काँग्रेसला 40.12 टक्के मते मिलाली आहेत. तर भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी 39.64 टक्के आहे. म्हणजेच भाजपाला आतापर्यंत मिळालेली मतं काँग्रेसच्या तुलनेत कमी आहेत, पण भाजपा साधारण 12 जागांवर काँग्रेसच्या पुढे आहे. दरम्यान, संध्याकाळपर्यंत हरियाणात नेमके कोणाचे सरकार येणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.   


हेही वाचा :


Haryana Vidhan Sabha 2024 Result Live : मोठी बातमी! हरियाणात काँग्रेस पिछाडीवर, भाजपा 46 जागांवर पिछाडीवर


Haryana Election Results: ऑलिम्पिकमध्ये अपात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश, थेट हरियाणाच्या निवडणुकीत उतरली; विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर?