चंदीगड : हरियाणा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. हरियाणात सध्या भाजपचं सरकार आहे. भाजप सरकारकडे सध्या 43 आमदार असून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला 42 आमदारांचा पाठिंबा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसनं जोरदार तयारी सुरु केली आहे. हरियाणा विधानसभेतील आमदारांची संख्या 90 आहे.भाजप आणि काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कुणाला द्यायची यासाठी चर्चा सुरु केल्या आहेत. भाजपकडून लवकरच उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर केली जाऊ शकते, अशी माहिती आहे. भाजपनं उमेदवारी देण्यासाठी सर्वेक्षण देखील केलेलं आहे. उमेदवार निवडीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांची मतं विचारात घेतली जाणार आहेत. आमदारांच्या कामाबद्दल कार्यकर्ते संतुष्ट आहेत की नाहीत याचा देखील विचार केला जाणार आहे.



भाजपनं काही दिवसांपूर्वी हरियाणातील जिल्हा कार्यालयात जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेत्यांचं मतदान घेतलं होतं. विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावं मागवली होती. यातूनचं प्रत्येक ठिकाणी एका उमेदवारी दिली जाऊ शकते.


दुसरीकडे काँग्रेसनं देखील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. विधानसभेच्या 90 जागांसाठी काँग्रेसकडे 2500 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत काँग्रेसकडून एक हजार जणांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. 



काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाखतीत संभाव्य उमेदवारांना त्यांच्या कामाबद्दल विचारलं जात आहे. काँग्रेसकडून जातीय समीकरण अन् अन्य गोष्टीचा देखील विचार केला जात आहे. इच्छुक उमेदवारांना तिकीट का दिलं जावं, असं देखील विचारलं जातंय. काँग्रेसनं आतापर्यंत 1 हजार जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आता निवडणूक जाहीर झाल्यानं ही प्रक्रिया वेगवान केली जाणार आहे. हरियाणा काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष दीपक बाबरिया होणार आहे. 


दरम्यान, भाजपनं ओपिनियन पोल केला असून कार्यकर्त्यांना देखील त्यांची मतं विचारली जात आहेत. याच आधारावर तिकीट वाटपाबाबत निर्णय होणार आहे. भाजपनं प्रत्येक जागेवरुन तीन नावं मागवली आहेत. भाजपनं  11 ऑगस्टला मतदान घेतल होतं. ओपिनियन पोल घेत कोणता उमेदवार निवडणुकीत जिंकू शकतो याबाबत अंदाज घेण्यात आला आहे.


संबंधित बातम्या : 


Jalgaon : रावेरमध्ये शाळेला शिक्षकच नाही, संतप्त सरपंचाने कुलूप लावले, पंचायत समितीच्या आवारातच शाळा भरवली


Samarjit Ghatge: कोल्हापूरच्या राजकारणातील मोठी बातमी, समरजीत घाटगेंचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित? 23 ऑगस्टला मेळावा