चंद्रपूर : राज्यात आणि देशात भाजपच्या विजयाचा वारु उधळलेला असला तरी चंद्रपुरात मात्र भाजपला 'दारु'ण पराभव पत्करावा लागलाय. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव म्हणजे ही दारुबंदीची पहिली विकेट असल्याचं वक्तव्य काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.


आतापर्यंत चार वेळा खासदार असलेले केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा बाळू धानोरकर यांनी 45 हजार मतांनी पराभव केला. शुक्रवारी चंद्रपुरात मोठ्या दिमाखात काँग्रेसची विजय रॅली निघाली. त्यावेळी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ही दारुबंदीची पहिली विकेट असल्याचे म्हटले.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आलेले आणि राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेली दारुबंदी हटविण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी हंसराज अहिर यांचा पराभव दारुबंदीचा परिणाम असल्याचे सूतोवाच केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये निवडणुकीत देखील दारुबंदी वरुन कलगी तुरा रंगला होता. काँग्रेस दारुबंदी फसवी असल्याचे सांगत होती तर भाजप नेते दारुबंदीचे समर्थन करत होते. त्यातच आता काँग्रेसला विजय मिळाल्यामुळे काँग्रेस नेते दारुबंदी हटविण्याची उघडपणे मागणी करत आहे.

Liquor Ban | चंद्रपूरमधील दारुबंदी उठवा, काँग्रेस खासदार सुरेश धानोरकरांची मागणी | ABP Majha



चंद्रपुरातील दारुबंदी उठवा, खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

चंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे दारुबंदी हटवा अशी मागणी महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली. 'एबीपी माझा'च्या 'ब्रेकफास्ट न्यूज' या कार्यक्रमात धानोरकर बोलत होते.

धानोरकर म्हणाले की, "दारुबंदी हा विषय चुकीचाच होता. स्वत:च्या विधानसभा मतदारसंघामध्ये 15 हजारांच्या मतांसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला. इथे मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाले. दारुबंदीसाठी ज्या नियम आणि अटी ठेवल्या होत्या, त्याची कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरु आहे. सरकारचा महसूल सुद्धा बुडालेला आहे. लोकांना तो पटणारा विषय नाही. एका जिल्हात दारुबंदी करुन काय साध्य करणार आहे. तुमच्या हातात केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश आहे. पूर्ण राज्यात दारुबंदी करायला हवी."

दारुबंदीनंतर चंद्रपूरात काय झालं?

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी होण्याआधी सरकारला दर वर्षी जवळपास 700 कोटींचा दारु विक्री आणि बार मधून महसूल मिळायचा. आता हाच महसूल सरकारला मिळायचा बंद झाला आहे.

दारुमुळे बार, हॉटेल, इत्यादी व्यवसाय तेजीत होते पण ते आता पूर्णपणे ठप्प झाले आहे.

या जिल्ह्यात 513 परवाना दारु विक्रेते होते तर 15 हजार लोकांना थेट रोजगार मिळायचा. आता लाकांचे रोजगाराचे हाल झाले आहे.

दारुबंदी झाल्यामुळे बेरोजगार झालेल्या लोकांना स्किल डेवलपमेंट करुन पर्यायी व्यवसाय देता आला असता पण ते झाले नाही.

दारुबंदी मुळे जिल्ह्यात शेकडो कोटींची दारु आणि मुद्देमाल जप्त केला गेलाय. हजारो लोकांवर दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तरी देखील दारुबंदी चा परिणाम झालेला नाही.

दारुबंदी चा परिणाम काहीही असला तरी दारुबंदी कार्यकर्ते मात्र मागे हटायला तयार नाही. त्यांच्या मते बाळू धानोरकर यांनी नकारात्मक विचार सोडून दारुबंदी च्या प्रभावी अंमलबजावणी साठी पुढाकार घेतला पाहिजे.

चंद्रपुरात चार वर्षांपासून दारुबंदी

चंद्रपूर जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी दारुबंदी झाली होती. 20 जानेवारी 2015 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दारुबंदीचा निर्णय घेतल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दारुबंदीचं आश्वासन दिलं होतं.

वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात आधीपासूनच दारुबंदी लागू आहे. मात्र चंद्रपूर हा भौगोलिकदृष्ट्या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्ये येतो. त्यामुळे चंद्रपुरात दारुबंदी नसल्याने वर्धा आणि गडचिरोलीतही दारुबंदीची नीट अंमलबजावणी होऊ शकत नव्हती.

चंद्रपुरात राज्यातली सर्वाधिक दारु विक्री होते, असा तज्ज्ञांचा अभ्यास आहे. त्यामुळे चंद्रपुरात दारुबंदी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी विशेष पुढाकार घेतला होता. बंग यांच्या मागणीला प्रतिसाद देत अखेर राज्य सरकारने चंद्रपुरात दारुबंदी लागू केली.

दारुबंदी असलेला चंद्रपूर हा राज्यातील तिसरा जिल्हा ठरला. चंद्रपुरात दारुबंदी केल्याने वर्षाला सुमारे दोनशे कोटी रुपये कमी महसूल मिळत आहे.