Sanjay Raut Press Conference : पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राज्यांत निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. अशातच गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election 2022) जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षानं कंबर कसली आहे. गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच त्यांना तिकीट देण्यावरुन राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर उत्पल पर्रिकर यांनी तर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही दिला आहे. अशातच आज याच मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं गोव्यात, राजकारणात पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढतायत, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मनोहर पर्रिकरांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असून त्याला अपमानित केलं जात आहे. त्याची औकात काढली जात आहे. मग तिकीट देण्याची चर्चा कधीपासून सुरु झाली. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिल्यास आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितल्यानंतर भाजपाची धावपळ सुरु झाली आहे. त्यांना तिकीट द्यावंच लागेल." 


गोव्यात, राजकारणात पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढतायत : संजय राऊत 


"मी कोणतंही राजकीय भाष्य करत नाही. पण मनोहर पर्रीकर गोव्यातील प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचं योगदान आहे. आज गोव्यात जी भाजपा दिसत आहे त्यात मनोहर पर्रिकर यांचंच योगदान आहे. आजही गोव्यात भाजप त्यांच्या नावानंच ओळखली जाते आणि त्यांच्याच मुलाची औकात काढली जात आहे. गोव्यात, राजकारणात पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत, हे चांगलं वाटलं नाही. त्यांना तिकीट देणं, न देणं ही पुढील गोष्ट आहे. पण उत्पल पर्रिकर यांच्या जागी माफियाला तिकीट दिलं जात आहे. उत्पल पर्रिकर यांचं ट्वीट मी पाहिलं आहे. तिथे कोणाला तिकीट देत आहात त्यावर चर्चा करा, त्यानंतर पाहू.", असं संजय राऊत म्हणाले. 


उत्पल पर्रिकरांचं तिकीट का थांबवलं? हा मोठा प्रश्न : संजय राऊत 


"भाजपनं उत्पल पर्रिकरांना तिकीट देण्यासाठी इतका वेळ का लावला? ते कोण सांगणार? जे बोलत आहेत त्यांच्या हातात असतं तर त्यांनी कधीच तिकीटासंबंधी निर्णय घेतला असता. हे फक्त बोलघेवडे आहेत. उत्पल पर्रिकरांचं तिकीट का थांबवलं आहे? हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत पडण्याचं कारण नाही. जर उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहणार असतील तर मनोहर पर्रीकरांना आदरांजली म्हणून सर्व राजकीय पक्षांनी विरोधात उमेदवार देऊ नये इतकंच आमचं म्हणणं आहे.", असंही राऊत म्हणाले. 


"महाराष्ट्रातही अनेकदा असं घडतं. एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाविषयी सहानुभूती असते. एखादी व्यक्ती निवडणुकीला उभं राहिल्यास आपण लढणार नाही म्हणून सांगतो. गोव्यात ही परंपरा नसली तरी मी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.", असंही संजय राऊत म्हणाले. 


दरम्यान, उद्या गोव्यात जात असून उमेदवारांची यादी घोषित करू. राष्ट्रवादीदेखील त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करेल. आम्ही उद्या लढण्यासंबंधी चर्चा करु, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा