Sanjay Raut On BJP : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींनी कुंभ स्नान केलं आणि नंतर दलितांना सोबत घेऊन त्यांचे पाय धुतले होते. भाजपची लोक दलितांच्या घरोघरी जात आहेत. मात्र तुमच्या मनातून जात कधी जाणार? माणूस आहे त्याची जात नसते, असं मी मानतो, असं राऊत यांनी म्हटलं आहे. परंतु तुम्ही दलितास दलित तर मुस्लिमास मुस्लिम बनवतात. दलित म्हणून त्यांच्या घरी जेवण करतात. तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन जेवत आहात, तुम्ही एखादी जात किंवा व्यक्तीच्या घरात जाऊन नाही जेवण करत आहात हे संपूर्ण ढोंग आहे, राजकारण आहे. मतपेटीचं राजकारण तुम्ही करू इच्छित आहात. असं करू नका देश पुन्हा एकदा जातीप्रथेवरून विभाजित होईल, असंही संजय राऊत म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, कोरोना काळात गंगेत जे मृतदेह वाहून गेले ते येऊन त्यांना मत देणार आहेत का? जिवंत माणसं तर त्यांना मतदान करणार नाहीत. कधीच नाही करणार, असं राऊत म्हणाले.
राऊत पुढं म्हणाले की, अखिलेश यादव यांनी देखील आपले संपूर्ण लक्ष निवडणुकीवर केंद्रीत केले पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन लढाई लढली पाहिजे. अहंकार सर्वांनाच बुडवतो, हे आपल्या समोर उदाहरण आहे. लोक फार मोठ्या अपेक्षेने अखिलेश यांच्याकडे पाहत आहेत. आम्ही देखील निवडणूक लढवत आहोत, आम्ही निवडणूक लढवू परंतु परिवर्तनाची ताकद जी आहे ती काँग्रेस, अखिलेश आणि जे कोणी भाजपाविरोधातील पक्ष असतील त्यांना मिळूनच लढावे लागेल, असं ते म्हणाले.
राऊतांनी म्हटलं की, मनोहर पर्रिकर हे गोव्याचे प्रमुख नेते होते, गोव्याच्या विकासात त्यांचं नक्कीच योगदान होतं. परंतु त्यांच्या मृत्यू नंतर भाजपने ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबाशी एकप्रकारे वैर घेतलेलं आहे, ते काय कोणाच्या मनाला पटत नाही. जरी आम्ही वेगळ्या राजकीय पक्षाचे असू, भाजपा विरोधात लढत असलो तरी देखील उत्पल पर्रिकरांचा ज्या प्रकारे अपमान केला जात आहे. पर्रिकरांच्या कुटुंबाबद्दल अशाप्रकारे जे बोलताय त्यांची लायकी काय असं जर आम्ही विचारलं तर?, मला खात्री आहे उत्पल पर्रिकरांना त्यांना उमेदवारी द्यावी लागेल.
राऊत म्हणाले की, आम्ही सगळेच जण त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे म्हणून भाजपला उत्पल पर्रिकरांचा विचार करावा लागतो आहे, तो दिल्लीत केला जातोय. जर उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असतील तर सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल पर्रिकरांच्या मागे ठामपणे उभा रहावं, अशी आमची भूमिका आहे, असं राऊत म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha