मुंबई : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र शिवेसना-भाजप युतीच्या ईशान्य मुंबईच्या जागेच्या तिढा अजूनही कायम आहेत. शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका किरीट सोमय्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. किरीट सोमय्या यांच्यऐवजी मनोज कोटक यांचं नाव शर्यतीत सर्वात पुढे असल्याची माहिती मिळत आहे.


ईशान्य मुंबईतून युतीचे उमेदवार किरीट सोमय्या असणार की मनोज कोटक याचा अंतिम निर्णय संसदीय केंद्रीय समिती करणार आहे. मात्र मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना पक्षाने दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र लोकसभेसाठी पक्षाकडून मनोज कोटक यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.


मनोज कोटक कालपासून ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मनोज कोटक यांच्या कार्यालयात भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसोबत ये-जा सुरु झाली आहे. त्यामुळे मनोज कोटक निवडणुकीच्या कामाला लागण्याचे संकेत मिळत आहेत.


किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटकांचा विचार करावा, असा सूचक सल्ला मुंबई महापालिकेतील शिवसेना नेत्यांनी दिला होता. भाजपने किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटकांना तिकीट दिलं तर शिवसैनिक त्यांच्या पाठिशीच उभा असेल, असं शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. मनोज कोटक यांच्या व्यतिरिक्त ईशान्य मुंबईतून भाजपकडून पराग शाह, प्रकाश मेहता आणि प्रविण छेडा यांची नावं चर्चेत आहेत.



संबंधित बातम्या


किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध कायम


रामदास आठवलेंना ईशान्य मुंबईची उमेदवारी द्या अन्यथा 'नोटा'ला मतदान करु, आरपीआय कार्यकर्त्यांचा इशारा


किरीट सोमय्यांनी केलेली टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत : राहुल शेवाळे


सोमय्यांच्या डोक्यावरील टांगती तलवार कायम, फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या बैठकीतही तोडगा नाही