Aditya Thackeray On Amit Thackeray: मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाकडे (Mahim Vidhan Sabha) सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ठाकरे घराण्यातील मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढणार आहे. अमित ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी नसेल, कारण या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल. 


अमित ठाकरेंना (Amit Thackeray) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल माहीममधील अनेक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. आता माजी मंत्री आणि वरळीतील ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी देखील अमित ठाकरेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचे दोन भाऊ अमित ठाकरे आणि वरुण सरदेसाई देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत. मी सर्वांना शुभेच्छा देतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 


'वरळी'चा समुद्रही साफ करुन देणार- अमित ठाकरे


निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर अमित ठाकरेंनी काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी निवडणुकीत जिंकल्यानंतर प्रथम दादर-माहीममधील समुद्रकिनाऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगितलं. तसेच मी निवडणुकीसाठी तयार आहे. माहीम मतदारसंघातील प्रश्नांची मला जाण आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. यानंतर तुमच्या मतदारसंघालाचा लागून वरळीचा मतदारसंघही आहे. तुमच्या भावाच्या मतदारसंघातही समुद्रकिनारा आहे, असं पत्रकारांनी म्हटलं. वरळीचा समुद्रकिनाराही साफ करुन देईल..तो (आदित्य ठाकरे) हो म्हटल्यावर वरळीचा समुद्रकिनाराही साफ करुन देईल, असं अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंच्या या विधानानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. 


2022 साली अमित ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड-


अमित राज ठाकरे यांचा जन्म 24 मे 1992 रोजी झाला. अमित ठाकरेंचं पदवीधर, एमबीए (मार्केटिंग) असं शिक्षण आहे. राजकारण, फुटबॉल आणि व्यंगचित्र रेखाटणे ही अमित ठाकरेंची आवाड आहे. 23 जानेवारी 2020 साली अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2022 साली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ठाकरे परिवारात जन्म झाल्याने जन्मापासून अमित ठाकरे यांच्यावर महाराष्ट्र आणि देशपातळीवरील राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार होत होते. अमित ठाकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाला कॉलेज जीवनापासूनच सुरुवात केली. सन 2006 मध्ये राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केल्यानंतर अमित ठाकरे ही राजकारणात जास्त सक्रिय झालेले पाहायला मिळाले. या दरम्यानच्या काळात त्यांनी माननीय राज ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र दौरा केलाच पण यामध्ये ठाकरे परिवाराचा सदस्य असल्याने कोणतीही जास्त अपेक्षा केली नाही.


संबंधित बातमी:


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आरएसएसचा 288 जागांचा सर्व्हे, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार, विधानसभा निवडणुकीत काय होणार?


अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर आदित्य ठाकरे काय म्हणाले?, Video: