मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि काँग्रेसच्या उत्तर मुंबई मतदार संघातील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज बोरिवलीत एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी उर्मिला मातोंडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, मी परवानगी घेऊन बोरिवलीत रॅलीचे आयोजन केले होते. माझी रॅली बोरिवली स्थानकाजवळ आली तेव्हा 10-12 गुंड मोदी-मोदी अशा घोषणा देत होते. या कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. तसेच ते लोक अश्लील हावभाव करत होते. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी या गुंडांना मारहाण केली. याप्रकरणी मी पोलिसात तक्रार केली आहे. तसेच इथून पुढे मला प्रचारादरम्यान संरक्षण देण्याची मागणीदेखील केली आहे.

उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना याबाबत विचारले असता, शेट्टी म्हणाले की, जे लोक मोदी-मोदी अशा घोषणा देत होते, ते सामान्य नागरिक होते, ते मोदीसमर्थकच असणार. त्यात काँग्रेसला वाईट वाटू शकतं. परंतु मोदी समर्थकांनी मोदींच्या नावाने घोषणा दिल्या तर, त्यात त्यांचं काय चुकलं? उर्मिला मातोंडकर आणि त्यांचे कार्यकर्ते रेल्वे स्थानक परिसरात का गेले? तिथे जाण्याची त्यांना परवानगी कशी मिळाली? असे सवाल शेट्टी यांनी उपस्थित केले आहेत.

VIDEO



शेट्टी म्हणाले की, ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य प्रवाशांवर हात उचलला त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी मी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन करणार आहे. राहुल गांधींसमोरही अनेकदा लोकांनी मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या आहेत. परंतु राहुल गांधी कधी असे चिडत नाहीत. या प्रकारानंतर उर्मिला मातोंडकर यांचं डिपॉझीट जप्त होईल हे नक्की.

VIDEO | उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत मोदी-मोदीच्या घोषणा | मुंबई | एबीपी माझा