पुणे : पुण्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेला महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. विम्याचे तीस लाख रुपये मिळावेत, यासाठी संबंधित महिलेच्या भावानेच तिची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृत्यू अपघाती असल्याचं भासवलं, असं पोलिस तपासात समोर आलं आहे.

पुण्यातील हिंजवडी पोलिसांनी शनिवारी 40 वर्षीय आरोपी जॉन डॅनिअल बोर्डे याला बेड्या ठोकल्या आहेत. 9 सप्टेंबर 2018 रोजी 44 वर्षीय संगीता हिवाळे यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र सात महिन्यांनी हा प्रकार आरोपीने रचलेला बनाव असल्याचं उघड झालं.

काय होता दावा?

आरोपी जॉन डॅनिअल बोर्डे बहीण मनिषा हिवाळे यांना कारने रुग्णालयात नेत होता. त्यावेळी कारमध्ये संगीता यांचा 15 वर्षीय मुलगा सायमन आणि आई मायाही होत्या. अर्ध्या वाटेत कारमध्ये बिघाड झाल्यामुळे आपण, सायमन आणि आई गाडीतून खाली उतरलो, असं जॉनने सांगितलं. तितक्यात कारने पेट घेतला. आपण बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही मिनिटातच गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने संगीता यांचा होरपळून मृत्यू झाला, असं जॉनने सांगितलं होतं.

प्रत्यक्षात काय झालं?

आरोपी जॉन आणि संगीता यांचं पैशावरुन भांडण झालं. रागाच्या भरात त्याने बहिणीचं डोकं जमिनीवर आपटलं. यावेळी घरात दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने जॉनने तिला गाडीत बसवलं. संगीता यांचा मुलगा सायमन आणि आई माया यांनाही जॉनने सोबत घेतलं.

VIDEO | खासदार उदयनराजेंनी नरेंद्र पाटलांचं चॅलेंज स्वीकारलं | सातारा



कात्रज-देहू रोड बायपासवर गाडीत बिघाड झाल्याचं सांगत जॉन खाली उतरला. सायमन आणि आईलाही त्याने गाडीतून खाली उतरवलं. तर संगीता ग्लानीत असल्यामुळे गाडीतच बसून होत्या. काही वेळाने सायमन आणि आईचं लक्ष नसल्याचं पाहून जॉनने दहा लीटर केरोसिन संगीता यांच्या अंगावर आणि गाडीवर ओतलं, त्याचवेळी गाडी पेटवून दिली.

सायमनने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग पसरल्यामुळे त्याला यश आलं नाही. आरोपी जॉनही बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा बनाव करत होता.

दरम्यान, सीएनजी कारला आग लागल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तपासणीत पोलिसांना केरोसीनचे अवशेष आढळले आणि पोलिसांनी जॉनची कसून चौकशी केली. चौकशीत जॉनने हत्येची कबुली दिली. विम्याचे तीस लाख रुपये मिळावेत, यासाठी बहिणीची हत्या केल्याचं जॉनने सांगितलं.