मुंबई : मतदार ओळखपत्र नसेल किंवा मतदान यादीत नाव नसेल तरी फॉर्म क्र. 7 भरुन मतदान करता येते, अशी खोटी माहिती सध्या व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे, असं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलं आहे.

फॉर्म 7 भरून मतदान करता येते, या आशयाची व्हॉटसॲप, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर वायरल झाली आहे. मात्र या पोस्टवर मतदारांनी विश्वास ठेवू नये. फॉर्म क्र. 7 हा इतर व्यक्तींचं नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी, स्वतःचं नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तीचं नाव मृत्यू/स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी करावयाचा अर्ज आहे. त्यामुळे 'फॉर्म क्र. 7 भरुन मतदान करता येतं' हा मेसेज खोटा आहे. मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणं आवश्यक असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितलं.

मतदार यादीत नाव असेल आणि मतदार ओळखपत्र नसेल, तरी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या इतर 11 ओळखपत्रांद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो, असंही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलं.

जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, तर कोणतं ओळखपत्र चालू शकेल?

  1. आधारकार्ड

  2. पॅनकार्ड

  3. ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालक परवाना)

  4. पासपोर्ट (पारपत्र)

  5. छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक

  6. मनरेगा कार्यपत्रिका

  7. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

  8. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज

  9. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)

  10. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड

  11. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्यांसाठी त्यांना दिलेलं ओळखपत्र