नागपूर : केस विंचरताना अनेक महिलांना केसांना लावायची पिन तोंडात धरायची सवय असते. मात्र हीच सवय चंद्रपुरातील सहा वर्षीय चिमुरडीच्या अंगलट आली आहे. तोंडात धरलेली लोखंडी पिन तोंडावाटे पोटात जाऊन अडकली. तब्बल चार महिने पोटात अडकलेली तीक्ष्ण पिन नागपूरच्या शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी यशस्वीरित्या बाहेर काढली. असह्य वेदनांमधून चिमुरडीची अखेर सुटका झाली.
चंद्रपूरच्या भद्रावती भागात राहणारी सहा वर्षांची पायल धारणे. चार महिन्यांपूर्वी सकाळी केस विंचरताना पायलने नेहमीच्या सवयीप्रमाणे केसाला लावायची पिन तोंडात धरली होती. केसात कंगवा फिरवताना अनावधानाने ती पिन तिच्या पोटात गेली. पायलला वडिलांनी स्थानिक डॉक्टरांकडे नेलं. एक्स रे काढल्यावर लहान आतड्यांच्या सुरुवातीच्या भागात पिन अडकल्याचं दिसलं.
केळी खाल्ल्याने शौचावाटे पिन बाहेर पडेल, असं स्थानिक डॉक्टरांनी सांगितलं. मात्र पिन काही केल्या शरीराच्या बाहेर निघाली नाही. पायलच्या वेदना पाहून कुटुंबीयांनी इतर डॉक्टरांकडे उपचार सुरु केले. मात्र ती शरीराबाहेर काढणं कुणालाही शक्य झालं नाही.
एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल चार महिन्यांपासून पोटात लोखंडी पिन अडकल्याने पायलचे पालक चिंताग्रस्त होते. गंजणारी ती लोखंडी पिन त्यांच्या मुलीच्या आयुष्याला धोका पोहचवण्याची भीती त्यांना होती. अशात ते उपचारासाठी नागपूरच्या शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात पोहचले.
डॉक्टरांनी पायलची तपासणी केली. आवश्यक एक्स रे काढल्यावर पिनचा एक भाग पोटातील आम्लामुळे गळून निघून गेल्याचं लक्षात आले. मात्र पिनचा तीक्ष्ण भाग लहान आतड्यांच्या सुरुवातीच्या भागात रुतून बसल्याचं एक्स रेमध्ये दिसून आलं. डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे आतड्यात रुतून बसलेली पिन काढण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड तासाच्या एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे चार महिन्यांपासून पोटात असलेली पिन काढण्यात शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आलं.
आतड्यात रुतून बसलेली पिन पोटातून काढणं अत्यंत धोकादायक होतं. जराशी चूक झाल्यास इतर अवयवांना इजा होऊन अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका होता. तसं झाले असतं, तर पायलचा जीव धोक्यात आला असता. मात्र अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेविना चार महिन्यांपासून पोटात अडकून असलेली पिन बाहेर काढल्याने पायलला नवं जीवदान मिळालं आहे. चार महिन्यांच्या असह्य वेदनांमधून तिची सुटका झाली. आता ती तिच्या पालकांसह गावी परतली आहे.
तोंडात धरलेली केसांची पिन अनवधानाने पोटात, चार महिन्यांनी चिमुरडीची असह्य वेदनांमधून सुटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Apr 2019 04:25 PM (IST)
चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या सहा वर्षांच्या पायल धारणे या चिमुरडीने चार महिन्यांपूर्वी केस विंचरताना पिन तोंडात धरली होती. केसात कंगवा फिरवताना अनावधानाने ती पिन तिच्या पोटात गेली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -