पिंपरी चिंचवड : "मी ब्रह्मचारी आहे. देवाच्या साक्षीने सांगतो. शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडून आले आहेत. फक्त मताधिक्य किती देताय हे सांगा," असं धक्कादायक विधान राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. या विधानाने महादेव जानकर अडचणीत येण्याची चिन्ह निर्माण झालीत.

शिरुर विधानसभा क्षेत्रात रांजणगाव येथे प्रचारावेळी महादेव जानकर यांनी हे वक्तव्य केलं. ब्रह्मचारी आहेत हे पटवून देण्यासाठी त्यांनी लग्न न केल्याचा आणि घर-दार नसल्याचा दाखला दिला. शिवाय यासाठी आईची शपथ घ्यायला ही ते विसरले नाहीत.

शिरुर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे. शिरुर मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोकं फिरलंय का? असा प्रश्नही जानकर यांनी उपस्थित केला. एका देशात दोन पंतप्रधान तुम्हाला मान्य आहे का? संविधान आणि तिरंगा जाळला त्यावर गुन्हा दाखल करु नये? हे ही मान्य आहे का? मग शरद पवारांच्या पक्षाला कसं काय मान्य आहे. त्यांचं डोकं फिरलंय का? अशी टीका जानकरांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा संपणारा पक्ष आहे. घराघरात भांडणं लावणं आणि जातीजातीत तेढ निर्माण करण्याचं यांनी पाप केलं, असा घणाघात ही जानकरांनी केला.