मुंबई : दक्षिण मुंबईचे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 एप्रिल रोजी झवेरी बाजार येथे व्यापारांशी संवाद साधताना त्यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचं वक्तव्यं केल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता.


या विधानाविरोधात शिवसेना उमेदवारांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली होती.  त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पोलिसांनी मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

VIDEO | बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मिलिंद देवरांनी काय म्हटलं शिवसेनेबद्दल? | मुंबई | एबीपी माझा


जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.  यामुळे  मिलिंद देवरा यांच्या विरोधात एल टी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी आचारसंहिता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेने मिलिंद देवरा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

शिवसेनेच्या वतीने अ‍ॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी 8 एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यासोबत देवरा यांच्या भाषणाची सीडीही पाठवली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि 171 आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

मिलिंद देवरा हे दिवगंत काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे सुपूत्र आहेत.  2009 साली ते दक्षिण मुंबईतून निवडून लोकसभेवर गेले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मोहन रावले यांचा पराभव केला होता.  त्यानंतर 2014 साली मोदी लाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. मिलिंद देवरा यांनी संपुआ दोनच्या कार्यकाळात केंद्रात मंत्रीपद भूषवले आहे. ते सध्या मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत.