डॉ. धवलसिंह हे प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब विजयसिंह मोहिते कुटुंबाच्या विरोधात काम करीत होते. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या काळात सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून उभी केलेली फळी धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मागे आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या दिवशीच धवलसिंह यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. यानंतर गेल्या आठवड्यात सांगोला येथे शरद पवार आले असता पुन्हा धवलसिंह यांची दुसरी बैठक झाली होती. मात्र काल रात्री माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.
गेल्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. या दोन मोहिते कुटुंबात गेल्या 25 वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. पहिल्यांदाच ही दोन्ही कुटुंबं माढा लोकसभेसाठी भाजपच्या मागे उभी आहेत. धवलसिंह यांच्या भाजपाला पाठिंबा देण्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होणार आहे. राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी संजय शिंदे मैदानात आहेत तर भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर निवडणूक लढवत आहेत.