मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांमधलं इनकमिंग-आऊटगोईंग सुरुच आहे. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा स्वगृही परतणार आहेत. छेडा उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजपप्रवेश करणार आहेत.
भाजपने आज लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करताना ईशान्य मुंबईतील उमेदवार घोषित केला नव्हता. या जागेवर किरीट सोमय्या विद्यमान खासदार असून युतीतील मित्रपक्ष शिवसेनेचा सोमय्यांना विरोध आहे. त्यामुळे प्रवीण छेडा हे किरीट सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घाटकोपरमधून काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिलेले प्रवीण छेडा पराभूत झाले होते. सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या भाजपच्या पराग शाह यांनी छेडा यांचा पराभव केला होता.
मंत्री प्रकाश मेहता यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे प्रवीण छेडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर ते घरवापसी करणार आहेत.
समाज आणि देशाच्या सेवेसाठी भाजपचा झेंडा पुन्हा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतल्याचं छेडांनी सांगितलं. उद्या (शुक्रवारी) दुपारी 12.39 वाजता छेडा चर्चगेटमधील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत.
काँग्रेसचे माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण छेडा यांची भाजपमध्ये घरवापसी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Mar 2019 11:41 PM (IST)
काँग्रेस नेते प्रवीण छेडा हे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत. प्रवीण छेडा हे किरीट सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -