मुंबई :  जर मराठी माणसाला पंतप्रधान करायची वेळ आली तर शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी आपली इच्छा आहे. ते देशाचे मोठे आणि सक्षम नेते आहेत. त्यांच्यापेक्षा कुवतीने कमी असलेले लोक देशाचे पंतप्रधान झाले आहेत, मग त्यांनी का होऊ नये, अशी भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना व्यक्त केली आहे. ते एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.


शिवसेना भाजपने देशासाठी युती केली आहे. देशात अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असं संजय राऊत यांनी युतीबद्दल बोलताना म्हणाले. आम्ही भाजपवर कधीच वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही त्यांच्यावर नेहमी धोरणात्मक टीका केली.

युतीच्या वाटाघाटीमध्ये आम्हाला पाहिजे ते मिळालं. आम्हाला अर्ध्या जागा मिळाले हे खूप आहे. युती होण्यापूर्वी मी जे बोललो, लिहिलं, सांगितलं ही पक्षाची भूमिका होती. माझी वैयक्तीत भूमिका नव्हती, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. काश्मीर प्रश्नावर भारताने कठोर व्हावं, अशी आमची भूमिका होती. भारताने पाकिस्तानसोबत युद्ध करावं, असं आम्हाला वाटत होतं आणि भारताने तशे पाऊल टाकायला सुरुवात केलं आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत आणि भाजप ते पूर्ण करेल, असा विश्वास आहे. काँग्रेसच्या हातात पुन्हा सत्ता जाऊ नये, तसेच देशातील अनेक प्रश्न आहेत ते पूर्ण व्हावे त्यासाठी युती झाली. आज जर बाळासाहेब असते तर त्यांची भूमिका काही वेगळी नसती. उद्धव ठाकरे यांची जी आज भूमिका आहे, तीच भूमिका बाळासाहेबांची असती. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की युती शिवाय पर्याय नाही. युती झाली नाही तर मतांची विभागणी होईल आणि त्याचा फायदा इतर पक्षांना होईल, असं राऊत म्हणाले.

शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. ते सक्षम आहेत मात्र त्यांच्या मागे संघटन नाही, ते एकाकी आहेत. एक मराठी माणूस म्हणून शरद पवार हे देशाची पंतप्रधान व्हावे, अशी आपली इच्छा आहे. का होऊ नये त्यांच्यापेक्षा कुवतीने कमी असलेले लोक देशाचे पंतप्रधान झाले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. शरद पवार माढातून निवडणूक लढवणार नाहीत, असं मला अनेकदा वाटत होतं. ते लढले जरी असते तरी त्यांचा पराभव झाला नसता, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी त्यांनी हे सगळ केलं, असंही ते म्हणाले.

चौकीदार चोर आहे की थोर आहे, असा त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आम्ही चौकीदार चोर आहे, असं कधी म्हणालो नाही. चौकीदार थोर आहे का नाही हे देशाची जनता येणाऱ्या निवडणुकीत ठरवेल. मात्र आम्ही चौकीदार नसून शिवसौनिक आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उभा राहील असा देशात नेतृत्व नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

गुण

सविस्तर उत्तरे- 10 पैकी 7 गुण

संदर्भासहित स्पष्टीकरण- 10 पैकी 7 गुण
एका वाक्यात उत्तरे - 10 पैकी 6 गुण
कल्पनाविस्तार - 10 पैकी 8 गुण
योग्य पर्याय निवडा- 10 पैकी 7 गुण
कोण कोणास म्हणाले? - 10 पैकी 6 गुण

एकूण 60 पैकी 41 गुण

Election Special | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी विशेष चर्चा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा