मुंबई : लोकसभा निवडणुकांचं मतदान जसजसं जवळ येत आहे, तसतशा सर्वच प्रमुख पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महाराष्ट्रातील काही उमेदवार घोषित झाले होते, मात्र युतीच्या बाजूने शिवसेना-भाजपकडून एकही उमेदवार जाहीर न झाल्यामुळे चित्र स्पष्ट होत नव्हतं. सेना-भाजप बहुतांश विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देणार, अशी अटकळ बांधली जात होतीच. परंतु आता भाजपने राज्यातील 16 उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे 48 पैकी काही जागांमधील लढती स्पष्ट झाल्या आहेत.


महाराष्ट्रातील बिग फाईट्स

उत्तर मध्य मुंबईपूनम महाजन (भाजप) VS प्रिया दत्त (काँग्रेस)
अहमदनगर - सुजय विखे पाटील (भाजप)  VS संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
नागपूर - नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस)
धुळे - सुभाष भामरे (भाजप) VS कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)
नंदुरबार- हीना गावित  (भाजप) VS के. सी. पडवी (काँग्रेस)
बीडडॉ. प्रीतम मुंडे  (भाजप) VS बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी)
वर्धा - रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस)
बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना) VS राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
अमरावती - आनंदराव अडसूळ (शिवसेना) VS नवनीत कौर राणा (राष्ट्रवादीचा पाठिंबा)
यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
गडचिरोली-चिमुर अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस)

---------------------

उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन (भाजप) VS प्रिया दत्त (काँग्रेस)

मुंबईतील उत्तर मध्य मुंबई या मतदार संघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त टक्कर देणार आहेत. गेल्यावेळी प्रिया दत्त यांना पूनम महाजन यांनी पराभूत केल्यामुळे त्यांच्याकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. सुरुवातीला प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मात्र पक्षातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर प्रिया दत्तही पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार झाल्या आहेत.

प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनिल दत्त यांची कन्या. सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईच्याच जागेवरुन खासदारकी मिळवली होती. 2014 च्या निवडणुकीत मात्र भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा 1.86 लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आपला मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी प्रिया दत्त पुन्हा कंबर कसतील.

अहमदनगर - सुजय विखे पाटील (भाजप)  VS संग्राम जगताप (राष्ट्रवादी)

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली होती. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता.

अहमदनगरमध्ये भाजपने विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवल्यामुळे दोन तरुण नेत्यांमध्ये सामना होणार आहे.

अहमदनगरच्या जागेसाठी अरुणकाका जगताप आणि प्रशांत गडाख यांची नावं चर्चेत होती. जगताप हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत घराणं असून त्यांचा नगरमध्ये दबदबा आहे. मात्र अरुण जगताप यांचे पुत्र संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे 'संग्राम'कार्ड टाकत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला काटशह देण्याचाच प्रयत्न केला आहे.

नागपूर - नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस)

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. भंडारा-गोंदिया या आपल्या मतदारसंघाला सोडून ते काँग्रेसकडून नागुपरातून निवडणूक लढवणार आहेत. पक्ष सोडला म्हणून काय झालं, आशीर्वाद संपत नाही, असं म्हणत नितीन गडकरींनी नाना पटोलेंना शुभेच्छाच दिल्या आहेत

2014 मधील निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर नाना पटोले भंडारा-गोंदियातून निवडून आले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला खडे बोल सुनावत त्यांनी 2017 साली पक्षाला रामराम ठोकला. जानेवारी 2018 मध्ये ते काँग्रेसच्या गोटात सामील झाले. त्या जागेवरुन पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी झाले, आणि भाजपच्या हातून सीट निसटली. दुसरीकडे, आगामी निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना आव्हान देण्याची घोषणा पटोलेंनी केली होती. आता ही संधी पटोलेंना चालून आली आहे.

धुळे - सुभाष भामरे (भाजप) VS कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे पुन्हा निवडणूक लढवण्यास अनुत्सुक असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भामरेंना भाजपने पुन्हा धुळ्यातून खासदारकीचं तिकीट दिलं आहे. त्यांच्याविरोधात उभा आहे नवखा उमेदवार. कुणाल पाटील हे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे सुपुत्र.  डॉ. सुभाष भामरे यांचे राजकीय विरोधक असलेले धुळे शहराचे भाजपचे विद्यमान आमदार अनिल गोटे यांनीही लोकसभा लढवणार असल्याचं जाहीर केल्यानं निवडणुकीतील चुरस आणखी वाढणार आहे.

वर्धा - रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस)

वर्ध्यातील भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्याविरोधात चारुलता टोकस यांना काँग्रेसने मैदानात उतरवलं आहे. चारुलता टोकस या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांच्या कन्या. त्यामुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होणार हे निश्चित

अमरावती - आनंदराव अडसूळ (शिवसेना) VS नवनीत कौर राणा (राष्ट्रवादीचा पाठिंबा)

शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या उमेदवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुजोरा दिला आहे. नवनीत राणा आपल्या 'युवा स्वाभिमान पार्टी'कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, मात्र राष्ट्रवादीकडून त्यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. त्यामुळे 2014 मधील हायव्होल्टेज ड्रामाची पुनरावृत्ती होणं निश्चित.

यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस)

शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच यवतमा-वाशिममधून पुन्हा तिकीट मिळणं निश्चित आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे रिंगणात उतरणार असल्यामुळे येथील बिग फाईटही पक्की आहे.

गडचिरोली-चिमुर - अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस)

भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेतेंनी 2014 च्या निवडणुकीत गडचिरोली-चिमुर ही जागा जिंकून उसेंडींना हरवलं होतं. त्यामुळे भाजपच्या हातातून ही जागा खेचून आणण्याचा उसेंडींचा प्रयत्न असेल, यात वाद नाही.