नांदेड : देशात दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी आज मतदान (Voting) होत आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील जागांसाठी मतदानाचा हक्क बजावला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमधील बिघाड, किरकोळ वादाच्या घटना समोर येत आहेत. आता, नांदेड जिल्ह्यातून (Nanded) धक्कादायक घटना घडल्याचे दिसून आले. येथील एका मतदान केंद्रावर चक्क कुऱ्हाडीचा घाव घालून ईव्हीएम मशिनचे दोन तुकडे करण्यात आले आहेत. तर, मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घनटेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. 


महाराष्ट्रातील अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे, सकाळपासूनच मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मात्र, नांदेड जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर संतप्त मतदाराने चक्क कुऱ्हाडीचे घाव घालून ईव्हीएम मशिनचे दोन तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. 


ईव्हीएम मशिनचे दोन तुकडे


नांदेडमध्ये मतदाराने आपला संताप व्यक्त करताना चक्क ईव्हीएम मशिन फोडलं, त्यावेळी कर्मचाऱ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर हा गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली.या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे तो ओरडत होता. त्यावेळी, मतदान केंद्रावर गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते, पण त्यांचाही नाईलाज झाल्याचे दिसून आले. या फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण, कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.


ईव्हीएमला होतोय विरोध


देशात सध्या विरोधकांकडून ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जातो. ईव्हीएम मशिनचा गैरवापर करुन भाजपा सत्तेत येत असल्याचाही आरोप अनेकदा होतो. त्यामुळे, ईव्हीएम मतदानाला विरोध करत, मतपत्रिका छापून मतदान घेण्याची मागणीही विरोधकांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता संतप्त तरुणाने कुऱ्हाडीचे घाव घालून ईव्हीएम मशिनचे तुकडे केले. 


महाराष्ट्रातील 8 जागांवर मतदान


दरम्यान, आजच्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 जागांसह केरळमधील सर्व 20 तसेच कर्नाटकातील 14 आणि राजस्थानच्या 13 प्रमुख मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी वरूर, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, अभिनेते अरुण गोविल, अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासह प्रमुख उमेदवार यावेळी रिंगणात आहेत.


हेही वाचा


पुणेकरांचा नादच खुळा... नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस; ढोला-ताशा वाजवून कंपनीतून धुमधडाक्यात एक्झिट