वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ध्यातून महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या सभेत मोदी काय म्हणाले, त्यांनी विरोधकांवर काय टीका केली? याबाबत फार कमी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. त्याउलट मोदींचा प्रभाव कमी झाला असल्याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे. मोदींच्या आजच्या सभेला नेहमीपेक्षा खूपच कमी गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. ज्या मैदानावर ही सभा पार पडली, ते मैदानही अर्धं रिकामं होतं. त्यामुळे मोदी लाट ओसरली असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.


एरव्ही मोदींच्या सभेला होणारी लाखो लोकांची उपस्थिती वर्ध्यात पाहायला मिळाली नाही. 2014 मध्ये मोदींनी वर्ध्यातूनच महाराष्ट्रातील प्रचाराला सुरुवात केली होती. मोदींच्या सभांनी तेव्हा खूप मोठी गर्दी होत होती. ही गर्दी पाहून देशभर केवळ मोदी लाटेची चर्चा रंगत होती. परिणामी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले होते. त्यानुसार यंदाही वर्ध्यात मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, मोदींच्या आजच्या सभेला आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा कमी लोक जमल्याचे पाहायला मिळाले.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा पार पडली. यंदाच्या लोकसभेसाठी मोदींची महाराष्ट्रातली ही पहिलीच सभा होती. मोदींच्या आजच्या सभेला भाजप आणि मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

VIDEO