मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर मतदारराजा कोणाला मतदान करायचं याची आकडेमोड मनातल्या मनात करत आहे. मतदानाच्या दिवशी रांग लावून मतदारराजा मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानाची खूण म्हणून डाव्या हाताच्या तर्जनीला (पहिले बोट) शाई लावण्याची पद्धत आहे. मात्र एखाद्याला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर काय प्रक्रिया केली जाते, याची तुम्हाला कल्पना आहे का?


डाव्या तर्जनीवर लावलेली शाई ही मतदान केल्याची खूण आहे. मतदान बुथवर तुमची ओळख पटवून तुम्हाला प्रवेश मिळतो. ईव्हीएमवर बटन दाबून प्रत्यक्ष मतदान करण्यापूर्वीच पुसली न जाणारी शाई तुमच्या डाव्या तर्जनीला लावली जाते. त्यानंतर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचं निशाण तुमच्या नावासमोर घेतलं जातं. त्यानंतर तुम्हाला मतदान करता येतं. ही शाई तुमच्या बोटावर पुढचे काही दिवस टिकून राहते.

डावी तर्जनी नसेल तर...

मतदान करण्यापूर्वी पोलिंग ऑफिसर तुमच्या डाव्या तर्जनीवर शाई तर लावलेली नाही ना, हे तपासून बघतो. जर शाई असेल, तर याचा अर्थ मतदाराने आधीच मतदान केलं आहे. साहजिकच ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी अपात्र ठरते. डाव्या तर्जनीची तपासणी करु न देणारी व्यक्तीही मतदानासाठी अपात्र असल्याचं पोलिंग ऑफिसर सांगू शकतात.

जर एखाद्या व्यक्तीला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर? निवडणूक आयोगाकडे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही इतर बोटाला शाई लावता येते. जर त्या व्यक्तीच्या डाव्या हाताला एकही बोट नसेल, तर त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावली जाते. उजवी तर्जनीही नसेल, तर उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावली जाते. एखाद्या केसमध्ये व्यक्तीला डाव्या किंवा उजव्या अशा कोणत्याही हाताला बोट नसेल, तर कोणत्याही हाताच्या पंजावर बोटाच्या मुळाशी शाई लावली जाते.