नवी दिल्ली : गोव्यात काँग्रेसला सिंगल डिजिटही जागा मिळणार नाहीत असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. यूपीत काँग्रेसला शून्य जागा मिळतील असं सपचे नेते अखिलेश यादव म्हणाले. ज्या पाच राज्यांच्या निवडणुका होतायत त्यातल्या दोन राज्यांत काँग्रेसच्या स्थितीबद्दल ही विधानं आहेत त्यांच्याच मित्रपक्षांची. गोव्यात काँग्रेससोबत एकत्रित निवडणुक लढवायचा प्रयत्न अपयशी होतोय असं दिसल्यावर संजय राऊत यांचा संताप आज असा व्यक्त झाला.
गोव्यात 40 पैकी 30 जागा काँग्रेसनं लढाव्यात, आणि केवळ 10 जागा गोवा फॉरवर्ड पक्ष, राष्ट्रवादी, शिवेसना या तीन पक्षांना एकत्रितपणे द्याव्यात अशी शिवसेनेची मागणी होती.
ज्या पाच राज्यांच्या निवडणुका होतायत त्या पाच पैकी तीन राज्यांत काँग्रेस 2017 ला सर्वात मोठा पक्ष होता, पंजाब, मणिपूर आणि गोवा. पण मणिपूर आणि गोव्यात सर्वाधिक जागा असूनही काँग्रेसला सरकार बनवता आलं नाही. पाच पैकी चार राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री बनले. काँग्रेसनं गोवा फॉरवर्ड पार्टी या पक्षाशी युती केलीय. गोव्यात काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवण्यात यशस्वी होते की संजय राऊत यांचं भाकित खरं ठरतं हे लवकरच कळेल.
दुसरीकडे राजकीयदृष्ट्या सर्वात महत्वाच्या यूपीतही काँग्रेसला खिजवणारं विधान सप नेते अखिलेश यादव यांनी केलंय. 403 जागांच्या विधानसभेत काँग्रेसला शून्य जागा मिळतील असं अखिलेश काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यूपीत गेल्या दोन वर्षांपासून मेहनत घेतायत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 403 पैकी अवघ्या 7 जागा मिळाल्या होत्या. तर 2012 च्या निवडणुकीत 27. त्यामुळे प्रियंका आता पक्षाला या राज्यात किती प्रगतीपथावर आणतायत हे पाहावं लागेल.
उत्तर प्रदेशची निवडणूक दिसताना चौरंगी, पंचरंगी दिसत असली तरी मुख्य लढत अखिलेश विरुद्ध योगी अशीच दिसतेय. त्याचमुळे भाजपचे कॅबिनेट मंत्री आणि आमदारही राजीनामे देत सपाच्याच बाजूला येताना दिसतायत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी परवाच भाकित केलं होतं 13 आमदार भाजपची साथ सोडतील. त्यानुसार हा आकडा आता जवळपास 12 च्या आसपास पोहचला आहे.
शरद पवारही काँग्रेसचे जुने मित्र असले तरी यूपीत काँग्रेसपेक्षा समाजवादी पक्षाच्याच बाजूला सगळी ताकद लावताना दिसतायत. भाजपला हरवायचं असेल तर ही ताकद सपाकडेच आहे असं त्यांचंही मत. ज्या स्वामी प्रसाद मौर्य या कॅबिनेट मंत्र्याच्या भाजप सोडण्यानं पहिला मोठा भूकंप झाला त्याचे पवारांशी उत्तम संबंध होते. पवारांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा यूपीच्या राजकीय वर्तुळात होती.
निवडणूक आली की इतर राजकीय पक्षांबद्दल भाकितं करणं हा खरंतर राजकीय रणनीतीचाच भाग. पण काँग्रेसबद्दलची ही भाकितं त्यांचेच मित्रपक्ष करताना दिसतायत. शिवसेना सध्या महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत आहे. तर सपाही कधीकाळी यूपीएचा भाग होती. शिवाय अगदी मागचीच विधानसभा काँग्रेस-सपा यूपीत एकत्र लढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस या पाच राज्यांच्या निवडणुकीत किती चमकदार कामगिरी याची उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :