नवी दिल्ली : राज्याचे संभाव्य उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची जी चर्चा सुरू आहे त्यावर आमच्या पक्षात काहीच चर्चा झाली नाही. आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यात तुलना होऊ शकत नाही. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. आम्ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कुठलेही पद महायुतीत मागितलेले नाही. ते केंद्रात मंत्रिपद घेऊ शकले असते मात्र त्यांनी ते घेतल नसल्याची स्पष्टोक्ती देत शिनसेना शिंदे गटाचे खासदर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे.
आम्ही राज्यपालांना भेटून शपथविधीचा तारीख घेऊ
भाजप- महायुती सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला आहे. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. दरम्यान याच मुद्यावर नरेश म्हस्के म्हणाले की, बावनकुळे हे भाजपचे अध्यक्ष आहेत. आम्ही राज्यपालांना भेटून शपथविधीचा तारीख घेऊ. सरकार आमचं येणार हे नक्की झाल आहे. गृहमंत्री पदावरून आमच्यात कुठलाही तिढा नाही. आम्ही विचार करून निर्णय घेणार आहोत. काल एकनाथ शिंदे यांनी तस जाहीर केल आहे. अमित शाह, जेपी नड्डा इत्यादि वरिष्ठनेते मुख्यमंत्री पदासाठी जो निर्णय घेतील त्याच्या सोबत आम्ही असल्याचेही खासदर नरेश म्हस्के म्हणाले.
संपूर्ण राज्याला उत्सुकता
अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत बैठक झाली होती. यावेळी अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच इमानेइतबारे काम केलं होतं का?, याचा विचार देखील मंत्रिपद देताना विचारत घेतलं जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री किती असणार कोण कोण असणार याचाही फैसला अजून झालेला नाही. महायुतीची बैठक होणं अपेक्षित असताना ती लांबलेली आहे. सत्तास्थापनेआधी महायुतीची बैठक कधी होणार याची उत्सुकता आहे. त्याचसोबत महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादीने आपापले गटनेते जाहीर केलेत. मात्र अजूनही भाजपची विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा रखडलीय. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.